महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे केरळ आपत्तीग्रस्तांसाठी १४ लाखांचा निधी सुपूर्द

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी जमा केलेला १४ लाख ११ हजार रुपये निधी आज (शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर २०१८) रा.स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा निधी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा अँड. अलकाताई पेठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

या वेळी जनकल्याण समितीचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, विनय चाटी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर तसेच पुण्यातील संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक उपस्थित होते. 

विशेष म्हणजे मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. ९ वीत शिकणाऱ्या अनिश सांगवीकर या विद्यार्थ्याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम केरळ आपत्तीग्रस्त निधीसाठी दिली आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने याशिवाय ३.५० लाख रुपयांचा मदतनिधी महाराष्ट्र शासनाकडे जमा केला आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आत्तापर्यंत विविध प्रसंगी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा प्रकारचा निधी संकलित केला असून जनकल्याण समितीच्या माध्यमातून हा निधी केरळमधील बांधवापर्यंत पोहोचवण्याची संधी संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आनंद व्यक्त केला. 

केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती विनायकराव डंबीर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *