“शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, खोड्या, मारामाऱ्या मला आज आठवत आहेत. आज मला जे प्रेम, जिव्हाळा मिळाला तो अनमोल आहे, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, तो मी ह्रदयात जपून ठेवत आहे. पुनर्जन्म मिळाला तर मी पुण्यातच जन्माला येईन आणि भावे हायस्कूलचाच विद्यार्थी होईन,” अशा शद्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाचं. 29 जुलै 1922 हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं शिक्षण झालं. ते ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात शाळेनं आपल्या या माजी विद्यार्थ्याचा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. शाळेतील यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के. एन. अरनाळे आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे उपस्थित होते.
शाळेतील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एन.सी.सी.) मानवंदना देऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शाळेच्या आवारात स्वागत केलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बाबासाहेबांचे औक्षण केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेब ज्या वर्गात शिकले त्या वर्गापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांच्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत बाबासाहेबांचा वर्ग होता. तिथे वेदमंत्रांच्या उच्चारांनी बाबासाहेबांने अभिष्टचिंतन करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील जिवंत देखावा साकारून बाबासाहेबांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या राष्ट्रपुरूषांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांचा जयजयकार या विद्यार्थ्यांनी या वेळी केला. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीति …” हे स्फूर्तिगीत यावेळी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांनीच लिहीलेल्या ‘हिरकणी’ या कथेची समिक्षा सौ. रमा लोहोकरे यांनी सादर केली आणि त्यानंतर या कथेचे अभिवाचन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे, सौ. गौरी पुरंदरे, सौ. प्रमिला सातपुते, अतुल दळवी आणि सौ. सुनीता खरात यांनी केले. हा सर्व कार्यक्रम बाबासाहेब अत्यंत तन्मयतेने अनुभवत होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही कथा ऐकत असताना मी मनाने रायगडावरच होतो. आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते शाळेनं केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो आहे. मी 95 वर्षांचा झालो असलो तरी शाळेनं आज दिलेलं प्रेम, जिव्हाळा पाहून मला लहानच राहावं असं वाटतं आहे. आजचा हा आगळावेगळा सोहळा पाहून मी थक्क झालो आहे. आज इतक्या वर्षांनी मी शाळेच्या या वेगळ्याच जगात आलो आहे. देवानं मला विचारलं तर मला पुन्हा या पुण्यातच जन्माला यायचं आहे आणि भावे हायस्कूलमध्येच शिकायचं आहे. शाळेतल्या अनेक घटना अजूनही मला आठवत आहेत. शाळेतल्या लेले सरांनी भूगोल शिकवताना हे विश्व किती मोठं आहे आणि आपण त्यात किती कणभर आहोत हे सांगतानाच आपल्यातही आकाशाएवढं होण्याची क्षमता आहे हे लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे खूप शिका, खूप दंगा करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आज माझ्यावर केलंत तसंच शिवचरित्रावर प्रेम करा.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के.एन. अरनाळे यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आलं. तसंच मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. के. कुलकर्णी यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला.

Scroll to Top
Skip to content