
दामिनी दिलीप देशमुख यांचे इ. ५ वी चे इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे. इ. १२ वी च्या परीक्षेत शाळेत त्या सर्वप्रथम आल्या होत्या. शालेय जीवनात त्यांनी धनुर्विद्या आणि किक-बॉक्सिंग या खेळांमध्ये राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली.
दामिनी देशमुख यांची डिसेंबर २०१९ मध्ये भारतीय वायूसेनेत निवड झाली. सैन्यात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दामिनी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपली शाळा आणि शिक्षकांना दिले होते. “आज आभार नाही मानणार, तुमच्या ऋणातच राहायला आवडेल” असे त्या म्हणाल्या होत्या.
सैन्यदलांमध्ये महिलांना सेवेची संधी मिळावी, शालेय वयातच त्यादृष्टीने जडणघडण व्हावी या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९५ मध्ये केवळ मुलींना सैनिकी शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हातील कासारआंबोली येथे म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरु केली. महाराष्ट्राच्या सर्व भागातून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते. गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीत शाळेतील विद्यार्थिनींनी शैक्षणिक तसेच गिर्यारोहण, अश्वारोहण, क्रीडा, कला अशा सर्वच शिक्षणेतर व शिक्षणपूरक क्षेत्रातील स्पर्धांमध्ये नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थिनी सैन्याच्या पायदळ, वायूदल, नौदल, तटरक्षक दलात दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस दल, केंद्र सरकारी सेवांच्या माध्यमातून विविध आव्हानात्मक क्षेत्रात कार्यरत आहेत.
