‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनातून विस्तारते कल्पनांचे क्षितिज : डॉ. माधवी मेहेंदळे

“कला ही सर्वांना जोडते. मनातील भाव चित्रांच्या माध्यमातून प्रकट करता येतात, कल्पना स्वातंत्र्याला वाव मिळाल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘रंगवेध’सारख्या चित्रकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे क्षितिज विस्तारत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण देखील होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सामाजिक संदेश देणारी, पर्यावरण विषयक मांडणी असणारी चित्रे देखील या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळत आहेत. ‘मएसो’च्या शाळांमध्ये असलेली ‘मएसो कलावर्धिनी आर्ट वॉल’ चित्रकलेविषयी मोलाचे योगदान देत आहे,” असे मत ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’ तर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाचे डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६) करण्यात आले.  या प्रसंगी त्या बोलत होत्या.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, कमांडंट एव्हीएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक व प्रदर्शनाचे समन्वयक संदीप पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

कासारआंबोली येथे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांपैकी निवडक चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते, एक शिल्प दडलेले असते. त्याला वाव देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून रंगवेध, स्वरवेध, तालवेध इ. उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘रंगवेध’च्या भव्य कलादालनात सुमारे ३०० निवडक चित्रांचे प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना चालना देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ‘रंगवेध’ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’ चित्रकला विषयक नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्याच्या चित्रांचे एक उच्च दर्जाचे कलादालन उभारते हीच एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. आपण पुन्हा एकदा चित्र काढायला शिकत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन तर चित्रकला शिक्षिका  सौ. यशोदिनी कुलकर्णी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

तीन दिवसांच्या या प्रदर्शनात सुलेखन, फेस पेंटिंग, शिल्पकला इत्यादी विषयावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘रंगवेध’ दि. २९ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 

‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे ‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनाचे २७ मार्चपासून आयोजन

मएसो कलावर्धिनी आयोजित रंगवेध चित्रकला प्रदर्शनाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना (छायाचित्रात डावीकडून) कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन्, डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. दिलीप शेठ, संदीप पवार.

पुणे, दि. २३ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे तीन दिवसीय ‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७, २८ व २९ मार्च २०२६ रोजी कासार आंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रंगवेध चित्रकला प्रदर्शनाचे हे ५ वे वर्ष आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रसिद्ध नेत्र शल्य विशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे.

मएसोच्या पुणे शहर, कासार आंबोली, सासवड, बारामती, अहिल्यानगर, शिरवळ, कळंबोली, पनवेल व बेलापूर येथे असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली निवडक चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून मएसो कलावर्धिनीतर्फे चित्रकला, संगीत, नाट्य, नृत्य, शिल्पकला इ. कलाविषयक विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती मएसो कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती देताना मएसो कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, सुमारे २५००० हजार विद्यार्थी वर्षभरात या प्रदर्शनासाठी व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, संकल्पचित्र, स्मरणचित्र, वस्तुचित्र अशी विविध स्वरुपाची चित्रे आपल्या आवडीनुसार रेखाटतात. विद्यार्थ्यांनी वर्षभरात काढलेली ही चित्रे शाळेतील ‘मएसो कलावर्धिनी आर्टवॉल’वर प्रदर्शित केली जातात. या चित्रांची शालेय स्तरावर देखील स्पर्धा आयोजित होत असते. त्यातील निवडक चित्रे आंतरशालेय स्तरावर या स्पर्धेसाठी निवडली जातात. त्यातील सुमारे ३५० निवडक चित्रे  रंगवेध चित्रकला प्रदर्शनासाठी पाठवली जातात. यावेळी होणाऱ्या स्पर्धेत इ. १ ली ते  ४ थी,  इ. ५ वी ते  ७ वी, इ. ८ वी ते  १० वी,  इ. ११ वी आणि  १२ वी अशा ४ गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके दिली जातात.

या प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे कला संचालक व सुप्रसिद्ध चित्रकार मा.डॉ. किशोर इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक असतील. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल.

हे चित्रकला प्रदर्शन रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.०० वा. पासून दिवसभर सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी खुले रहाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर एम यज्ञरामन्, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड, सिनिअर मास्टर संदीप पवार व समन्वयक रविराज थोरात यांनी केले आहे.

मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन

महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये तयार करण्यात आलेल्या गणित प्रयोगशाळेचे उद्घघाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. प्रशालेचे माजी विद्यार्थी स्व. श्री. दिलीप ताटके यांची पत्नी श्रीमती दिपा ताटके, माजी विद्यार्थी डॉ. सुनिल दिनकर पटवर्धन तसेच श्रीमती मृदुला पायगुडे, सौ. सीमा गुप्ते-पाटील यांनी दिलेल्या निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सीए श्री. राहुल मिरासदार, प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे, संस्थेचे सचिव डॉ. श्री. अतुल कुलकर्णी व संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच ताटके कुटुंबिय उपस्थित होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गणित प्रयोगशाळेचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून गणित शिकण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती ठेवून अभ्यासात प्रगती करावी तसेच गणित प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करावा तसेच गणित विषयाची भीती न बाळगता प्रयोगशाळेच्या माध्यमातून गणित अधिक सोपे व रंजक बनवावे, असा सल्ला दिला.

प्रशालेतील शिक्षिका सौ. मेघना देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशालेतील शिक्षिका श्रीमती लता टिळेकर यांनी केले.

‘नवोन्मेष’ हॅकेथॉन उत्साहात संपन्न

‘नवोन्मेष – २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आसाम, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली आणि चंडीगड यांसारख्या राज्यांमधील सुमारे १३०० स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.

‘नवोन्मेष’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, एमईएस मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व उद्योजक अजय पुरोहित आणि किन्नयशोदा सामाजिक संस्थेच्या संस्थापक सौ. सुमेधा संभाजी लिह्मण यांच्या हस्ते करण्यात आले. किन्नयशोदा सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक यश प्रशांत पाटील यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती.

आरोग्यसेवा, शाश्वत विकास, फिनटेक, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक अशा विविध क्षेत्रांशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी सादर केले. आयसिनर्जी, व्हीफोर्सी, स्किली, ओरॅकल अप्लिकेशन्स, बीएनवाय मेलन आणि मिअरस टेक्नॉलॉजीज यांसारख्या अग्रगण्य संस्थांमधील अनुभवी तज्ज्ञांमार्फत या प्रकल्पांचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या प्रकल्पांची उपयुक्तता आणि परिणामकारकता तसेच त्या संदर्भातील व्यावहारिक दृष्टीकोन समजला.

ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती, तीन कठोर फेऱ्यांमध्ये ती पार पडली. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि समस्या सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेला अधिकाधिक आव्हान देण्यासाठी प्रत्येक फेरीची रचना करण्यात आली होती. अंतिम फेरीत निवडक संघांनी आपल्या अभिनव कल्पना आणि कार्यक्षम प्रोटोटाइप सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पारदर्शक मूल्यमापन पद्धती आणि उद्योग क्षेत्राशी परिपूर्ण सहकार्य यामुळे नवोन्मेष हॅकेथॉनने नवकल्पनांना चालना देणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आरोग्यसेवा, शाश्वतता, फिनटेक, ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योग-प्रेरित समस्यांची काळजीपूर्वक निवड ही नवोन्मेष ची खासियत असून त्यामुळे या हॅकेथॉनची उपयुक्तता आणि परिणामकारकता ठळकपणे दिसून येते.

‘नवोन्मेष’चा समारोप आयसिनर्जीचे संस्थापक अतुल ठोंबरे, शिक्षणतञ डॉ. अमोल गोजे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय भालेराव तसेच एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘नवोन्मेष – २०२६’ हा उपक्रम परिवर्तनशील विचारांना प्रोत्साहन देत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्यकालीन नेतृत्वाची पायाभरणी करणारा ठरला आहे.

 

Scroll to Top
Skip to content