‘विकसित भारता’साठी शिक्षण संस्थाचे योगदान महत्त्वाचे

“विकसित भारत घडवण्यासाठी शिक्षण संस्थांचे योगदान महत्वाचे असून भारतीय मूल्ये आणि संस्कार जपणारी आदर्श शिक्षण संस्था उभी करण्याचे आव्हान महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसमोर आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना गुणवत्तेला दिले जाणारे प्राधान्य कायम राखणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी आज (गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६) केले. संस्थेच्या १६६ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे माजी सचिव आर.व्ही. कुलकर्णी व वि.ना. शुक्ल, संस्थेचे विद्यमान सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयातील आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक कै. वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे यांचे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील भित्तीशिल्प तसेच सभागृहातील प्रतिमांना पुष्पांजली वाहून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), आर.व्ही. कुलकर्णी आणि संस्थेच्या कार्यालयातील निवृत्त कर्मचारी वामनराव शेंड्ये यांनी संस्थेला देणगी दिली.

बाबासाहेब शिंदे बोलताना पुढे म्हणाले, “१६६ वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना झाली तेव्हा सामाजिक परिस्थिती वेगळी  होती, आधुनिक शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता, देशावर ब्रिटीशांची सत्ता होती. अशी सर्व आव्हाने स्वीकारून राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे यांनी संस्थेची स्थापना केली. आजच्या आव्हानांचे स्वरुप वेगळे आहे मात्र ही आव्हाने स्वीकारून आणि त्यावर मात करून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची वाटचाल सुरू आहे. आजचा काळ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल तंत्रज्ञान, अनेकविध कौशल्ये यांचा आहे. बदलत्या परिस्थितीत अभ्यासक्रमांची रचना नव्याने केली जात आहे. शिक्षणाबरोबरच व्यक्तीच्या गरजा पुरविण्यासाठी संशोधनाची कास जगभरातील शिक्षण संस्था धरत आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीदेखील त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत असताना त्यादृष्टीने काय केले याचे उत्तर आपल्याकडे असले पाहिजे. सर्वाधिक तरूण लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांवर आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘स्व’त्वाची जाणीव निर्माण होण्यापासून रोखले जात असेल तर स्वदेश, स्वभाषा आणि स्वराष्ट्राचा विचार तरूण पिढीत रुजवला पाहिजे. कारण, राष्ट्रीय दृष्टिकोन बाळगणारे तरूणच अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तोंड देऊ शकतील. नोकरी मागणाऱ्या तरूणांऐवजी नोकऱ्या देणारे तरूण निर्माण करण्याची गरज आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यादृष्टीने सतत प्रयत्नशील राहील.”

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना प्रदीपजी नाईक म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कालानुरुप शिक्षण देण्याची आणि देशभक्तीने प्रेरित झालेले जबाबदार नागरिक घडविण्याची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. समाजात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने होत असलेले बदल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करत संस्थेचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रुजवण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांना पार पाडावी लागेल. ‘रामायण’ या नुकत्याच प्रसारित झालेल्या हिंदी चित्रपटाद्वारे रावणाचे महिमामंडन करत समाजाच्या श्रद्धा आणि जीवनमूल्यांवर आघात करून देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न देशविघातक शक्ती करत आहेत. अशा प्रकारची आव्हाने यापूर्वी देखील उभी राहात होती, परंतू सध्याचे त्याचे स्वरुप अधिक प्रभावी आहे. शिक्षण संस्था म्हणून आपण समाजाच्या उभारणीत आजपर्यंत योगदान देत आलोच आहोत, परंतू आता आपल्या प्रयत्नांची गती वाढविण्याची गरज आहे. तसा संकल्प आपण आजच्या निमित्ताने करू या. आपल्या देशाला आव्हाने नवीन नाहीत, ती परतवून लावण्यात सहभागी होण्याचा आनंद या संकल्पातून आपल्याला मिळेल.”

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, “वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वर्षभरातील वाटचालीचे सिंहावलोकन केले पाहिजे. कुठे होतो, कशी वाटचाल केली आणि कुठे पोहोचलो? कोणता नवीन विचार केला, कोणत्या नवीन संकल्पना राबवल्या? याचा आढावा घेऊन पुढील वर्षासाठी नवा संकल्प करून संस्थेच्या कार्याला नवे वळण देण्याचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकवून त्यामध्ये त्यांना पारंगत करणे, संस्थेच्या शाखांमध्ये पर्यावरणपूरक व्यवस्था विकसित करणे अशा स्वरुपाचे संकल्प करणे गरजेचे आहे. संस्थेच्या शाखांमधून होत असलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांना अधिक चालना दिली तर आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, हितचिंतक यांची सक्रियता वाढेल आणि संस्थेला मिळणाऱ्या आर्थिक योगदानात वाढ होईल. आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत नवनवीन कौशल्ये, परकीय भाषा अशा विविध विषयांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची सुविधा निर्माण केल्यास ‘एमईएस’चा ब्रँड विकसित होण्यास चालना मिळेल.”

कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, “राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या आपल्या संस्थेचा वर्धापनदिन, राष्ट्रीय एकात्मता दिन आणि राणी लक्ष्मीबाई यांची जयंती १९ नोव्हेंबर या एकाच दिवशी असणे हा एक विशेष योगायोग असल्याचे नमूद केले. १६६ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने अनेक टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत. नव्यानेच स्थापन झालेल्या संस्थेच्या मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि लॉ कॉलेज या दोन्ही नव्या महाविद्यालयांनी पहिल्याच वर्षात परिक्षांमध्ये उत्तम निकाल प्राप्त केले आहेत. तसेच दुसऱ्या वर्षांसाठीचे प्रवेश शंभर टक्के क्षमतेने पूर्ण झाले आहेत. संस्थेची ध्येधोरणे, परंपरा आणि समाजाचा संस्थेवर असलेला विश्वास यांच्या पात्रतेती ही पावती आहे.”

सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Scroll to Top
Skip to content