“संविधान उद्देशिकेचे वाचन हा उपक्रम न राहता त्याचे अनुसरण ही लोकचळवळ व्हावी” – डॉ. पराग काळकर

पुणे, दि. २६ : “भारतासारख्या विविधता असलेल्या खंडप्राय देशातील सर्व समाजघटकांना एकसूत्रात बांधून ठेवण्यासाठी आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी समर्पक अशी कार्यपद्धती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या रुपाने आपल्या देशाला दिली. राज्य घटना दिनाच्या निमित्ताने तिच्या उद्देशिकेचे वाचन हा केवळ एक उपक्रम न राहता त्याचे अनुसरण करणे ही लोकचळवळ व्हावी, तिची तत्वे आपल्या नसानसांत भिनली पाहिजेत,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी आज येथे बोलताना केले. एम. ई. एस. लॉ कॉलेजमध्ये बसविण्यात आलेल्या भारतीय राज्य घटनेच्या ‘उद्देशिका’ फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे कुलपती नियुक्त सदस्य मा. श्री. रवींद्र शिंगणापूरकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. राहुल पाखरे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. अतुल साळवे, महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मधुश्री जोशी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. काळकर पुढे म्हणाले, “देशाच्या राज्य घटनेने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्ये देखील सांगितली आहेत, त्यांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे याकडे दुर्लक्ष होते, याचा विचार झाला पाहिजे. राज्य घटनेच्या उद्देशिकेने अधोरेखित केलेली तत्वे लक्षात घेऊन त्यांची कायम जाणीव ठेवली पाहिजे. १४० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाची वाटचाल विकसित देशाकडे होत असताना ही तत्वे व्यवहारात आणण्याची आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. जगातील अनेक देशांमध्ये राज्य घटना असून सुद्धा तेथील व्यवस्था कोलमडून पडलेल्या आपण बघत आहोत. देशाच्या नागरिकांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी सुधारणा होत आहेत. लोकशाही व्यवस्थेत विरोध करण्याची देखील एक पद्धत आहे, ती मानणारच नाही असे म्हणून चालणार नाही.”
श्री. रवींद्र शिंगणापूरकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र, समता आणि बंधुता यांचा समावेश देशाच्या राज्य घटनेत केला आहे. आपली राज्य घटना ही अन्य कोणत्याही देशाच्या राज्य घटनेने प्रेरित होऊन लिहीलेली नाही. बौद्ध परंपरेतील तत्वांना अनुसरून आपण राज्य घटना लिहिल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगून देखील अपप्रचार केला जातो. देशाची राज्य घटना आणि कायदा यामधील फरक कायद्याच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे. संयम सुटतो तिथे कायदा येतो. व्यक्ती स्वाभाविकता विसरते तेव्हा कर्तव्याचे पालन करण्यासाठी कायदा करावा लागतो, त्यातून अडचणी निर्माण होतात. प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतू ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही ना याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण तशा घटना वारंवार घडत आहेत. एकीकडे समतेचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ असा उल्लेख करून समाजात भेद निर्माण करायचा. त्यातून घराघरात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आपले शेजारी देश आणि युरोपातील देश अराजकतेमुळे पेटले आहेत. आपल्या देशात तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आळशी बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मानवी मेंदू आणि शारिरीक हालचाली यांना कृत्रिम बुद्धिमत्ता हा पर्याय ठरू शकत नाही. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने केला पाहिजे.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. शिंदे म्हणाले, “ प्राचीन परंपरा, सांस्कृतिक विविधता असलेल्या आपल्या खंडप्राय देशाला एकसूत्रात बांधण्याची फार मोठी जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडली. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षे देशाची वाटचाल सुरळीत आहे. देशाला राज्य घटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विधीमंडळात जाण्यापासून रोखण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न का झाले, देशाचे कायदा मंत्री असताना त्यांना राजीनामा का द्यावा लागला? याचा अभ्यास कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून करावा. “संविधान धोक्यात” असल्याची ओरड करणाऱ्यांनी शहाबानो प्रकरणात राज्य घटनाच बदलली हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपल्या राज्य घटनेचा आत्मा लक्षात घेऊनच देशाला वाटचाल करायची आहे. देशातील तरूण वर्गाला ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ अशा विविध नावांनी संबोधून समाजात फूट पाडण्यासाठी देशातील तरुणांच्या मनांत वेगळा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, देशातील युवा वर्ग असाच त्यांचा उल्लेख करणे योग्य आहे. प्रचंड संख्या असलेल्या या युवा वर्गामुळेच देशात सकारात्मक बदल होतील. देशाच्या राज्य घटनेच्या आधारेच आपल्याला देशाच्या विकासाची व्याप्ती वाढवायची आहे. आपल्या राज्य घटनेला कोणीच हात लावू शकणार नाही, पण देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना रोखले पाहिजे कारण अराजकता असेल तर देशाचा विकास होणार नाही. देशातील तरूण पिढीच देशाचा विकास घडवून आणेल याची सर्वांना खात्री आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सागर नेवसे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्या डॉ. मधुश्री जोशी यांनी केले.
