७७ वा प्रजासत्ताक दिन शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे, शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सासवड येथील मएसो वाघिरे विद्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे होते. या वेळी प्रशालेचे जेष्ठ सेवक श्री. हनुमंत कारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गीत, राज्य गीत यांचे गायन झाले आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांच्या संचलनाने आणि मानवंदनेने शालेय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. पूर्व-प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक, इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी टटिंग नृत्य तसेच बालवाडी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबावरील विविध प्रात्यक्षिके सादर केली.
मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यासाठी पाच संकल्प सांगितले. तसेच शिस्त, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा हे आचरणात आणले तर स्वतःची, राज्याची आणि देशाची प्रगती होईल असे ते म्हणाले.
मराठी माध्यमाच्या पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा अशा पाचही शाखा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक माजी विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
म. ए. सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पूर्वीचे भावे स्कूल) कार्यक्रमाला शाळेतील १९७१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले एअर व्हाईस मार्शल किरण प्रभाकर पळसुले व्हीएसएम (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाला समितीचे मा. अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र श्री. सुधीर गाडे, शाळेचे पदाधिकारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी, शाळेच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सामुदायिक कवायत व विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली.
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेत ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रमिला कांबळे व सौ. विद्या शिरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम, डंबेल्स, सूर्यनमस्कार व तायक्वांदो यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमप्रकारे सादर केली. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी “नन्हा मुन्ना राही हूं” या देशभक्तीपर गीतावर उत्कृष्टतेने नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शाळेतील विद्यार्थी रियांश हिंगमिरे व आरोह सातव यांनी मराठी व इंग्रजीमध्ये प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. शाळेतील शिक्षिका सौ. रोहिणी पवार यांनी दिल्लीतील कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील संचलनाची तसेच महाराष्ट्राच्या चित्ररथाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्यासाठी छोट्या मुलांनी काय करणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीतातून वातावरणात अधिकच जोश निर्माण झाला. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका सौ. भारती कुंभार व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. व्यंकटेश माडगूळकर यांचे सुपुत्र श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे यावेळी उपस्थित होते. घोष पथकातील विद्यार्थ्यांनी वंशीवर राष्ट्रगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर ध्वजगीत सादर करण्यात आले. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रशालेतील शिक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांनी भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मा. श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत शिक्षण घेत असल्याचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. मा. श्री. अजय पुरोहित यांनी “भारत माझा देश आहे” या भावनेचा विसर पडू न देण्याची व आपण विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याची जाणीव ठेवण्याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी साधन कवायत, तर एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी या वेळी प्रेरणादायी गीत सादर केले. उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी लेझीम पथकाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.
म. ए. सो. चे. कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्ह्याचे मा. संघचालक श्री. दिपक पेशवे उपस्थित होते. कोल्हापूर येथील विभागीय मंडळातील शिक्षण उपसंचालक मा. श्री. राजेश क्षीरसागर, बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निलेश गवळी तसेच प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मा. श्री. दिपक पेशवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीताचे सादरीकरण व संविधानाचे वाचन झाले. एन. सी. सी., आर. एस. पी., स्काऊट व गाईड यांच्या पथकांनी घोष पथकाच्या साह्याने प्रमुख पाहुणे व पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. त्यानंतर विविध स्पर्धांत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
म.ए.सो.चे सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय, बारामती यांनी म.ए.सो.च्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित मएसो क्रीडा करंडक स्पर्धेत विविध खेळात यश संपादन केले. या सर्व खेळातील खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाचे “ऑपरेशन सिंदूर” वर आधारित देशभक्तीपर गीत, प्राथमिक विद्यालयाचे सूर्यनमस्कार, माध्यमिक विद्यालयाचे एन.सी.सी.चे “शौर्य, अनुशासन, धैर्य” यावर आधारित प्रात्यक्षिक, लेझीम प्रात्यक्षिक, सर्व विद्यार्थ्यांचे कवायत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
म. ए. सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे भारतीय नौसेनेतील अधिकारी श्री. संतोष तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित, महामात्र डॉ. श्री. गोविंद कुलकर्णी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. राजीव देशपांडे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. पी. बी. कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. इ. ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
म. ए. सो. ज्ञान मंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल, कळंबोली येथे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई विमानतळाचे इमिग्रेशन पोलीस निरीक्षक श्री. दिपक आबाजी कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर विद्यालयातील गायक वृंदाने राष्ट्र गीत, ध्वज गीत व राज्य गीत सादर केले. त्यानंतर आर. एस. पी.च्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले. या संचलनानंतर विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायत, एरोबिक्स, सूर्यनमस्कार व लेझीम इत्यादींचे सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते व स्फूर्तीदायक भाषणे यावेळी सादर करण्यात आली. म. ए..सो. क्रीडा करंडक विजेत्या खेळाडूंचे व इतर बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
