‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’तर्फे आयोजित करण्यात आलेली ‘स्वरवेध’ ही लोकगीत गायन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तालवाद्यांचे तज्ञ कलाकार संतोष मोरे आणि शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे होते. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना संतोष मोरे म्हणाले, “लोकगीत गायन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ‘मएसो’चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. ही कला मातीतील, लोकांनी जगवलेली, संतांनी भर घातलेली आहे, पालक आणि शिक्षकांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती भावी पिढ्या आत्मसात करत आहे. स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी कलाकार आहेत, कारण स्पर्धा असूनही त्यांच्या मनात कोणाबद्दल इर्षा नव्हती आणि जो मनाने निर्मळ असतो तोच कलावंत असतो. परिक्षक म्हणून आम्ही परिक्षण करत नव्हतो तर तो निखळ आनंद घेत होते. विद्यार्थी कोणत्याही शाळेचा असला तरी शिक्षकांमध्ये दिसलेला मातृवत्सलभाव या स्पर्धेत दिसून आला, हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेच्या रंगमंचाने दिलेला आत्मविश्वास हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे.”
शाहीर हेमंतराजे मावळे यांनी, एखादी कला शिकण्याचे आवाहन शिक्षकांना केले. किर्तन हे १० मिनिटांमध्ये सादर करणे शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली. आपल्या दिव्यंगत्वावर मात करून तसेच स्पर्धाकाळात आलेल्या तात्पुरत्या अडचणींवर मात करून प्रभावी सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना सादरीकरणासंदर्भात विविध सूचना केल्या.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत असताना लोककलांचा विसर पडू नये म्हणूनच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. असे वेगळ्या स्वरुपाचे उपक्रम आयोजित करणे हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवांतर वाचन आणि विविध कलागुणांची आवश्यकता असल्याने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कलागुणांना महत्व देण्यात आले आहे. जे सहज सादर होते ते लोकगीत. शाहीर, लोककलावंत हे संस्कृतीचे वाहक असतात. लोकगीतांनीच आजपर्यंत पिढ्या घडल्या आहेत आणि संस्कृती प्रवाही राहिली आहे.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ यांनी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रंगवेध, तालवेध आणि स्वरवेध या स्पर्धांचा आढावा घेतला. ‘जे जे देखील स्वप्नी, ते ते तैसेचि होतसे’ असे म्हणता येईल अशा पद्धतीने या स्पर्धा उत्तमरित्या पार पडत आहेत असे सांगून ते म्हणाले, “विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळते, त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षक यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत असतात. कलेची साधना करणाऱ्याला पूर्वी वाया गेला असे म्हणत असत, आज मात्र त्याच कलेद्वारे करियर घडू शकते.”
मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ४ थी), उच्च प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ. ८ वी ते ११ वी) अशा तीन गटात ६०० विद्यार्थ्यांनी ५८ संघांद्वारे सहभाग घेतला आणि लोकगीतांपैकी कीर्तन, भारुड, गवळण, पोवाडा या गायन प्रकारांद्वारे आपली कला सादर केली. यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

प्राथमिक गटात मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाने प्रथम क्रमांक मिळवला. मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गवळण या लोकगीत प्रकाराला दुसरा, मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने गोंधळ सादर केला होता, या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

उच्च प्राथमिक विभागात मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने पोवाडा सादर केला होता, त्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला दुसरा, मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी माध्यम विभागाच्या संघाला त्यांनी सादर केलेल्या किर्तनासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

माध्यमिक गटात मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, या संघाने भारुड सादर केले होते. मएसो रेणुका स्वरुप प्रशालेच्या संघाने भारुड सादर केले, त्यांना दुसरा; मएसो रेणावीकर विद्यालय, अहिल्यानगर शाळेच्या संघाने देखील भारुड सादर केले, त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने भारुड सादर केले, त्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या वेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे पालक समीर धर्माधिकारी या समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
समारंभाचे सूत्रसंचालन अनिल म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
