सासवडमध्ये शिक्षणाचा पाया वाघीरे विद्यालयाने रचला – आमदार संजय जगताप

सासवड, दि. १० : “ प्रदीर्घ परंपरा आणि इतिहास असलेल्या सासवडमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने वाघीरे विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया रचला.  शिक्षणासाठी आजदेखील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना ८ ते १० किलोमीटर लांब जावे लागते, १९०६ मध्ये वाघीरे विद्यालय सुरू करताना संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले कष्ट खूप मोलाचे आहेत. या शाळेने दर्जेदार शिक्षणाद्वारे उज्जवल व्यक्तिमत्वाचे असंख्य नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थीदशेत असताना अशा या शाळेत शिकणाऱ्या मित्रांचा हेवा वाटायचा”, अशा शद्बात पुरंदर-हवेली मतदार संघाचे आमदार मा. संजय जगताप यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा गौरव केला.

म.ए.सो. वाघीरे विद्यालयातील सभागृहाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सभागृह असे नामकरण आमदार जगताप यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १० डिसेंबर २०२२) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष मा. विजय कोलते यांच्या पुढाकारातून शाळेतील सभागृहाचे नामकरण करण्यात आले आहे. मा. विजय कोलते आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब भोसले, शाळेचे महामात्र श्री. सुधीर भोसले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व्यासपीठावर उपस्थित होते.

“वाघीरे विद्यालयाचा परिसर आता व्यापारी भाग झाला आहे. त्याचा विचार करून सासवडचा विकास करण्यात येत आहे. विकास आराखड्यात वाघीरे विद्यालयासाठीच्या विस्तारित जागेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अपेक्षा आम्ही सासवडकर म्हणून पूर्ण करू, संस्थेने त्यादृष्टीने नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा,” असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

मा. विजय कोलते यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांचे कर्तृत्व जगभरात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले की, ब्रिटीश कवि, नाटककार, अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांच्या स्ट्रॅटफोर्ड या जन्मगावी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक ठिकाणे हेच त्यांचे स्मारक आहे. शेक्सपिअरच्या स्मारकासारखेच आचार्य अत्रे यांचे भव्यस्मारक उभारण्याचे आम्ही ठरवले आहे. ब्रिटीश असल्याने शेक्सपिअर याचे नांव जगभर झाले. मात्र, चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आचार्य अत्रे मराठी असल्याने ते जगाला माहीत झाले नाहीत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्रंथालय यांना त्यांचे नांव देण्यात आले आहे, त्यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार देखील दिले जाता. मुंबईत वरळी येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी शासनाने मुख्यमंत्री निधीतून केलेले अर्थसहाय्य आणि प्रत्येक शिक्षकांने दिलेला प्रत्येकी पाच रुपये निधी अशा माध्यमातून प्रतिष्ठानकडे मोठा निधी जमा झाला आहे. पण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्या वाघीरे विद्यालयात त्यांच्या नावाचे एक सभागृह असणे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानतर्फे शाळेला आणि संस्थेला धन्यवाद देतो.

एअर मार्शल भूषण गोखले यावेळी बोलताना म्हणाले की, शक्ती आणि भक्तीचा संगम असल्याने पुरंदरचे नाव मोठे आहे. अशा गावात असलेल्या आमच्या संस्थेच्या वाघीरे विद्यालयाचा आम्हाला अभिमान आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. अटल टिंकरींग लॅब सारखे जिज्ञासूवृत्ती जोपासणारे विविध उपक्रम वाढविले पाहिजेत. पुढील पिढीला जिज्ञासू बनवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना सक्षम बनविण्यात आपले आणि देशाचे हित आहे. मा. विजय कोलते यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतार्य अत्रे यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी विनोदी विषयांवरील निबंध स्पर्धा आयोजित करावी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यासाठी निश्चितच सहकार्य करेल. सर्वांचे लाडके आमदार असलेले मा. संजय जगताप पाय जमीनीवर असलेले नेते आहेत. पुरंदर परिसराचा विकास करण्याची त्यांची तळमळ पुरंदर विमानतळासाठी ते घेत असलेल्या पुढाकारातून दिसून येते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात वाघीरे विद्यालय आणि सासवड यांच्यातील ऋणानुबंध उलगडले. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याबाहेर आपल्या कार्याचा विस्तार करताना १९०६ साली सासवडमध्ये शाळा सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच हेतू त्यामागे होता. तेव्हापासून शाळेने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये संस्थेप्रमाणेच सासवडमधील नागरीकांचादेखील मोठा सहभाग आहे. संस्थेने अतिशय परिश्रमपूर्वक ही शाळा सुरू केली. नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली. ही शाळा सुरू व्हावी, तिचा विस्तार व्हावा यासाठी  सासवडमधील विविध लोकांनी मदत केली. निधीसंकलन आणि लोकाश्रयातून शाळा उभी राहिली. शिक्षण संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा प्रघात नसताना नगरपालिकेने शाळेला वार्षिक १५० रुपये अनुदान सुरू केले. पुढील काळात त्यात वाढ करून वार्षिक ७०० रुपये अनुदान मिळू लागले. परिणामी शाळेला चांगले मुख्याध्यापक मिळत गेले, शाळेतील संस्कारांमधून चांगले विद्यार्थी घडत गेले. या शाळेने देशाला वि. म. तारकुंडे यांच्या रुपाने सरन्यायाधीश, डॉ. राम ताकवले यांच्यासारखे तीन कुलगुरू अशी  अनेक नररत्ने दिली आहेत. चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य अत्रे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांची आठवण राहावी यासाठी शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देण्यात येत आहे. वाघीरे विद्यालयाच्या परिसरातील प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करून त्या जागेत आचार्य अत्रे यांच्या नावाने एक भव्य सभागृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे.

ऐश्वर्या कामठे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातील ईशस्तवन आणि शेवटी वंदेमातरम सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक प्रमोद ठुबे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी केले.