शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने शकुंतला खटावकर सन्मानित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने शुभंकर खवले व प्रियेशा देशमुख गौरवान्वित

माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू, संघटक आणि मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शकुंतला खटावकर यांना आज २०२३-२४ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मल्लखांबपटू आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी शुभंकर खवले याचा आजच्या समारंभात २०२३ -२४ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

नेमबाज व मएसो रेणुका स्वरूप प्रशालेची माजी विद्यार्थिनी प्रियेशा देशमुख या दिव्यांग खेळाडूला पॅरा-शूटींग या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मएसो शूटींग रेंजवरील प्रशिक्षणाने प्रियेशा यांचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. तेथेच त्यांना आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज (शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५) झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात आले. या वेळी राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे दत्ता भरणे, मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शकुंतला खटावकर या ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला क्रीडापटू आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९७९ ते १९८२ या कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ८ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत.

प्रियेशा देशमुख यांचा आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव यांच्या हस्ते व अंजली भागवत यांच्या विशेष उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मएसोचे सहाय्यक सचिव व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक व मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. उमेश बिबवे आणि प्रियेशा यांचे वडील श्री. शरदराव देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

 

 

Scroll to Top
Skip to content