“आजचे पालक खूप जागरुक आहेत, जीवापाड मेहनत करून आपल्या मुलांना शिक्षणाच्या संधी आणि साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येतो आहे. आपल्याला मिळणाऱ्या या वेळेचा सदुपयोग करा आणि शिस्त, कठोर परिश्रम, समर्पित भावना व सातत्याने प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला पुणे रेल्वे विभागातील पोलीस अधीक्षक मा. सौ. अश्विनी देवधर – सानप यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज (मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५) मयूर कॉलनीतील म. ए. सो. ऑडिटोरियममध्ये दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. सानप बोलत होत्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, मएसोचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ६६ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील २८ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी सौ. सानप पुढे म्हणाल्या, “शिक्षणाप्रमाणे अन्यत्र यश मिळवण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी, तो पटवून देण्यासाठी संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास असणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी चौफेर वाचन आणि अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. आजकाल अनेकजण अतिशय आक्रमकपणे व्यक्त होतात, अशा परिस्थितीत आपण आपल्या संयमाची पातळी वाढवण्याची आज गरज आहे. पालकांनी मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली पाहिजे. त्यांना सोयी-सुविधा पुरवितानाच ती स्वावलंबी देखील होतील याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच अपयश आणि पराजय यांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्या निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे.”
समारंभाच्या प्रारंभी मा. सौ. आनंदीताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “जीवनात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभली आहे. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श ठेवावा हा या समारंभाच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घेत शिकता येईल असा अभ्यासक्रम निवडावा. शिक्षणात आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवत असताना आपल्या महान संस्कृतीची ओळख करून घ्यावी. त्यामुळे आपल्या देशाबद्दल आदर, आत्मीयता आणि समर्पणाचा भाव जागृत होईल. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हातून समाजाची सेवा घडेल तो संस्थेसाठी आनंदाचा दिवस असेल.”
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक म्हणाले की, आपल्या संस्थेत गुणवंत विद्यार्थी घडावेत, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जीवनात यश मिळवावे अशी प्रत्येक शिक्षण संस्थेची इच्छा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने नवीन शिक्षक निर्माण व्हावे लागतात. शिक्षक होणे म्हणजे घडवण्याचे सामर्थ्य असणे आणि या सृजनातूनच देशाची आणि समाजाची प्रगती होते. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये तशी गुणवत्ता आहे.
संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका सौ. उमा गोंधळेकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
