रोमहर्षक सैनिकी प्रात्यक्षिकांनी ‘युवा चेतना दिन’ साजरा

युद्धाच्या बातम्या, युद्धातील शौर्याच्या व पराक्रमाच्या कथा वाचायला सर्वांनाच आवडते पण युद्धात होणारी जीवितहानी कधीही भरून काढता येत नाही. म्हणूनच युद्धस्य कथा रम्याः असे म्हटले जाते. तरीही युद्ध झालेच तर ते कसे लढले जाते, प्रत्यक्ष रणभूमीवर लढणारे सैनिक कोणते तंत्र वापरतात, शत्रूवर तुटून पडण्यापूर्वी नियोजन कसे केले जाते, व्यूहरचना नेमकी कशी असते, तोफगोळे आणि विमानांच्या प्रचंड आवाजात देखील परस्परांशी संवाद कसा साधतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व महाविद्यालयांमधील ‘एनसीसी’च्या छात्रांनी सादर केलेल्या रोमहर्षक प्रात्यक्षिकातून. निमित्त होते, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिना’चे.
कासारआंबोली येथील म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत सोमवारी, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला महिंद्र समुहाच्या एरोस्पेस अँड डिफेन्स, ट्रक्स, बसेस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे प्रेसिडेंट मा. श्री. विनोद सहाय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी पुणे चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर शैलैंद्र मराठे, २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी पुणेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किरण राऊल, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी तसेच संस्थेचे मा. सहाय्यक सचिव आणि म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, सौ. सहाय, महिंद्र उद्योग समुहातील अधिकारीवर्ग, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच पालक, ग्रामस्थ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
‘एनसीसी’च्या छात्रांनी बॅटल फॉर्मेशन, रायफल ड्रील, सॅमाफोर सिग्नल्स, सायलेंट कम्युनिकेशन, सेक्शन अटॅक अशा विविध प्रात्यक्षिकांद्वारे नेतृत्वक्षमता, संघभावना, समन्वय आणि देशभक्ती यांचा परिचय करून देत उपस्थितांची मने जिंकली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील विद्यार्थ्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेले नृशंस हत्याकांड आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांचे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून केलेले सादरीकरण सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. राजधानी दिल्ली येथीस प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीत निवड झालेला ज्युनिअर अंडर ऑफिसर अनुराग पांडे याने या संचलनाचे नेतृत्व केले. आयएनएस विक्रांत, तेजस लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृतींनी सजलेल्या चित्ररथाने आणि सैनिकी शाळेच्या अश्वारुढ छात्रांनी या शिस्तबद्ध संचलनाची शोभा वाढवली.
विविध क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून उपस्थितांना ‘युवा चेतना दिना’च्या शुभेच्छा दिल्या. व्यक्तीच्या जीवनात शिस्त ही महत्वाची असते, सैन्यदलांमध्ये अनुशासनाला सर्वाधिक महत्व दिले जाते. हाच धागा घेऊन आजच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या कार्याचा आढावा घेताना श्री. भालेराव यांनी संस्थेच्या विविध शाखांमधील खेळाडूंनी केलेल्या नेत्रदिपक कामगिरीची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.
दैनंदिन जीवनात शुद्ध आचरण, नीतिमत्ता, नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन यांच्याशी तडजोड न करण्याचा सल्ला मा. सहाय यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या तत्वांचे पालन हेच मोठे देशकार्य असून प्रत्येकाने आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची कास धरली तर विकसित भारताचा संकल्प २०४७ सालापूर्वीच साध्य होईल असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी तरुणांना युद्धाचे शिक्षण दिले तर योद्धा संन्यासी अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी स्वत्वाची ओळख व्हावी यासाठी व्यक्तिमत्वातील दोष दूर करण्यासाठी अंतर्गत संघर्षाची प्रेरणा दिली. प्रत्येकाने या दोघांची शिकवण आत्मसात केली पाहिजे.
या वेळी प्रशालेच्या आवारात छात्रांनी तयार केलेल्या भारतीय नौसेनेच्या ताफ्यातील आयएनएस विक्रांत, आयएनएस इम्फाळ, आयएनएस शिवालिक या युद्धनौकात तसेच तेजस हे लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृती (मॉडेल) प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यांची सखोल तांत्रिक माहिती या छात्रांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांना दिली.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योति खिरीड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.
