आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो. योग हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेचा समावेश आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक सुदृढता आणि मानसिक संतुलन साधता येते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. वर्षभर योगाभ्यास करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
मएसो भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घेण्यात आल्या. इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. तसेच ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, भुजंगासन, पद्मासन इ. आसने विद्यार्थ्यांनी करुन दाखविली आणि मनोरे सादर केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालण्याचा व योगासने करण्याचा संकल्प केला.
मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये इ. १२ वी मधील सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक श्री. सुनील तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन इत्यादी विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. त्यांनी आसनांचे प्रात्यक्षिक योग्य पद्धतीने कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे तंत्र समजून घेण्यास मदत झाली. तसेच शिक्षणाच्या परिपूर्णतेसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाला आपल्या आयुष्यामध्ये नियमित भाग बनवण्याचा निर्धार केला.
बारामतीमधील मएसो कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात तीन हजार विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी एकाच वेळी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. विद्यालयातील योगशिक्षक श्री. दादासाहेब शिंदे यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पद्मासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी प्राणायाम, ओमकार, सूर्यनमस्कार यांची सामुहिक प्रात्यक्षिके करून घेतली. प्रात्यक्षिकांचे विवेचन क्रीडाशिक्षक श्री. अनिल गावडे यांनी केले.
मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरमधील विद्याधाम या संस्थेतील योगशिक्षक श्री. संजय सुरसे व योगशिक्षिका सौ. स्वाती सोनसळे हे उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी योगाभ्यासात सहभाग घेतला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये अशाचप्रकारे उत्साहाच्या वातावरणात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.