पुणे, दि. ११ : स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत, राजमाता जिजाऊंना अभिवादन करत माध्यमिक शाळांमधील लहानग्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या घोषपथकांनी सादर केलेल्या वीरवृत्ती आणि चेतना जागवणाऱ्या प्रांगणीय संगीत म्हणजेच मार्शल म्युझिकमधील रचनांनी युवा चेतना दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी युवा चेतना दिन साजरा करण्यात येतो. म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू जयंत गोखले आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर उप आयुक्त उज्ज्वल अरुण वैद्य या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेच्या विविध जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या १२ घोषपथकांनी विविध रचना यावेळी सादर केल्या. घोषपथकातील विविध आकारांच्या, आवाजांच्या, सूरांच्या आणि तालांच्या वाद्यांचा एकत्र मेळ घालत विद्यार्थ्यांनी केलेल्या सुरेल वादनाने प्रांगणीय संगीताची वैशिष्ट्ये उपस्थितांना अनुभवायला मिळाली. किरण तसेच भूप, केदार, शिवरंजनी रागातील पारंपारिक रचनांबरोबरच नव्याने बांधलेली ‘अयोध्या’ ही रचना सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी होती. या रचना सादर करताना काही घोषपथकांनी वर्तृळ, बाण अशा विविध आकारांच्या रचनेत उभे राहून, संचलन करत सादर केलेले वादन शिस्तीचा संस्कार सांगणारे होते. म.ए.सो. मुलांचे विद्यालयाच्या घोषपथकाने सादर केलेली ‘राम आएँगे आएँगे राम आएँगे…’ ही धून बरोबर एक वर्षापूर्वी झालेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्मृती जागवणारी होती.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने लष्करी गणवेशात आणि अतिशय शिस्तबद्धपणे केलेले सादरीकरण उपस्थितांना प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या सैन्यदलांच्या संचलनाचा अनुभव देऊन गेले. या घोषपथकाने सादर केलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’ या रचनेने वातावरण वीरश्री आणि देशप्रेमाने भारावून गेले. म.ए.सो. रेणुका स्वरुप प्रशालेच्या घोषपथकाने केलेले सादरीकरण ताल आणि सुरांच्या सुरेल संगमातून निर्माण होणाऱ्या नादाची अनुभूती देणारे होते. ‘अयोध्या’ ही नवीन रचना म्हणजे शौर्य आणि शांत रसाचे अभिनव मिश्रण होते.
संस्थेच्या विविध जिल्ह्यातील शाळांमधील घोषपथकातील साईड ड्रमर्सनी किरण आणि भूप रचनांवर आधारित एकत्रितरित्या सादर केलेले प्रात्यक्षिक म्हणजे तालसंगीतामुळे साधल्या जाणाऱ्या समन्वयाचे उत्तम उदाहरण होते. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने सादर केलेल्या ‘शिवगर्जने’ने या प्रात्यक्षिकांचा समारोप झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय भालेराव यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली.
या प्रसंगी बोलताना जयंत गोखले यांनी, खेळ आणि अभ्यास यांच्यात समन्वय साधण्याची गरज असली तरी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे याकडे लक्ष वेधले. अभ्यासाला वयाचे बंधन नसते मात्र खेळासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम करायला वयामुळे मर्यादा येतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या खेळाला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील आपल्या आवडीच्या खेळासाठी निश्चयपूर्व आणि झोकून देऊन सराव केला पाहिजे. देशात क्रीडा क्षेत्राला पोषक असे व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा असे ते म्हणाले.
उज्ज्वल वैद्य यांनी आपल्या भाषणात, शिक्षणात पुस्तकी ज्ञानावर भर दिला जात असून खेळातून होणाऱ्या संस्कारांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. शालेय वय हे लक्ष्य साध्य करण्याचे वय असते, आपले लक्ष्य साधण्यासाठी विविध साधनांचा वापर करावा लागतो. मात्र आपल्या मार्गात अडथळे आणणाऱ्या स्मार्टफोनसारख्या साधनांच्या आहारी जाऊ नका, गेम खेळणे, सोशल मिडियाचा वापर करणे यासाठी तो वापरू नका. आपले आई,वडील, शिक्षक, गुरुजन यांच्याशी मनातील गोष्टी मोकळेपणाने बोला. चुकीचे भय मनात ठेवू नका कारण त्यातून अधिक चुका होतात, असा सल्ला त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. उमेश बिबवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सुधीर भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.