महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर असून व्यवसायाने उद्योजिका आहेत. मार्च २०१७ पासून त्या मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. मएसो बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय सल्लागार समितीच्या सदस्य तसेच मएसो रेणुका स्वरुप करिअर कोर्सेसच्या सल्लागार समिती सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

यापूर्वी त्यांनी पुण्यातील औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलांची), औंध, पुणे (Government ITI – Boy’s) या संस्थेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या उपाध्यक्ष आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची), औंध, पुणे (Government ITI – Girl’s) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

बाबासाहेब शिंदे हे स्वतंत्र व्यावसायिक असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी या गावात ते ग्रामविकासाचे कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर ग्रामविकास गतीविधीची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

ऑक्टोबर २०१८ पासून ते मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. मएसो वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष तसेच मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि मएसोच्या बारामतीमधील शाळांच्या शाला समितीचे सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

डॉ. माधव भट आणि सीए अभय क्षीरसागर यांनी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर सौ. आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Scroll to Top
Skip to content