म.ए.सो.चे तीन विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी रोहन राजेंद्र पिंगळे आणि कपिल लक्ष्मण नलवडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी रोहित विष्णू गायकवाड याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव व डॉ. दिलीप शेठ, म. ए. सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व सहाय्यक सचिव सुधीर भोसले, म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, म. ए. सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहन पिंगळे हा म. ए. सो. आबासाहेब गरवारे कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेचा माजी विद्यार्थी असून त्याने ५८१ वा तर म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी असलेल्या कपिल नलवडे याने ६६२ वा क्रमांक मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ च्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांचीही भारतीय महसूल सेवेत निवड झाली आहे. याचबरोबर दिव्यांग असलेल्या रोहित गायकवाड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत यश मिळवले असून बृहनमुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदावर त्याची निवड झाली आहे.
कपिल नलवडे आणि रोहित गायकवाड यांना एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरमध्ये डॉ. शोभा कारेकर, डॉ. अपर्णा आगाशे, डॉ. विमली बसू आणि प्रा. किशन कुंबरे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!