महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द शिल्पकार श्री. प्रमोद जी कांबळे यांच्या हस्ते बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ . ३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री. चारुहास पंडित या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे.
हे चित्रकला प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांसाठी खुले असेल. शिरवळ आणि परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत हे प्रदर्शन बघता येणार आहे.
या दोन दिवसात सुंदर हस्ताक्षर, अक्षर लेखन, टाकावूतून टिकाऊ, कागदकाम, स्थिर चित्र, स्मरण चित्र अशा विविध विषयांवरील प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. मएसोच्या शाळांमधील कलाशिक्षक उमेश पवार, राजगौरी जगताप, माधुरी जगताप, नयना दिनकर हे विद्यार्थ्यांना या कला प्रकारातील विविध कौशल्ये उलगडून दाखवणार आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ कार्यरत आहे. मनातील कल्पनांना मूर्तरूप देण्याचे प्रभावी साधन म्हणजे चित्रकला! म्हणूनच ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे दरवर्षी ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना व्यासपीठ मिळवून देण्यात येते. या पूर्वी पुणे, बारामती, पनवेल येथे संस्थेच्या शाळांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ च्या माध्यमातून ‘रंगवेध’ प्रमाणेच दरवर्षी गायनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरवेध’ आणि विविध स्वरुपाच्या वाद्यवादनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.