मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. बाबासाहेब शिंदे, श्री. सुधीर भोसले, श्री. विजय भालेराव, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती सायली देशमुख व श्री. अजय पुरोहित

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वाढीव मजल्याचे बांधकाम आणि पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (रविवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. या प्रसंगी खा. मोहोळ यांनी मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित होण्याची आवश्यकता बोलून दाखविली. तर, राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करतील अशी अपेक्षा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागांच्या मुख्याध्यापिका श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती मंजुषा दुर्वे व श्रीमती सायली देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. विजय भालेराव, श्री. बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री. प्रदीपजी नाईक, डॉ. अतुल कुलकर्णी. मागील बाजूस (डावीकडून) श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती सायली देशमुख

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री खा. मोहोळ म्हणाले की, “देशभरात पुणे शहराचे महत्व आहे. महाराष्ट्राची  सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशा विविध कारणांमुळे पुण्याची वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे माहेरघर असल्याने देश -विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. शिक्षण क्षेत्रामध्ये पुणे शहराला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा मोलाचा वाटा आहे. अशा या संस्थेच्या भावे स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. १६३ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ज्ञानदानाची अविरत परंपरा कायम ठेवली आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देत संस्था नवीन गोष्टींचा स्वीकार करत आली आहे. अशा संस्थेशी आपण जोडले गेलेलो आहोत याचा आनंद, अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वाटचालींलदर्भात सातत्याने माहिती मिळत राहिली आहे. संस्थेच्या वाढीसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी निश्चित कृती आराखडा तयार करावा लागेल. शिक्षण क्षेत्रात मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित झाली पाहिजे, या संस्थेचा एक घटक म्हणून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी करीन.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “ मयूर कॉलनीतील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे आवार हे आदर्श कॅम्पस आहे. संस्थेच्या प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार असून संस्थेला लॉ कॉलेजसाठीची मान्यता मिळाली आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर ही ओळख निर्माण करून देण्यात संस्था अग्रस्थानी राहिली आहे. परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळावर चालवली जाणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेच्या काही मर्यादा आहेत. सध्याच्या काळात व्यापारी दृष्टीकोनातून चालवल्या जाणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध असतो आणि त्यांची कॅम्पस प्रचंड मोठ्या आकाराची असतात. ‘मएसो’ सारख्या संस्था या बाबतीत मागे पडतात. केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांनी आपला राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच भविष्यातील पन्नास वर्षे संस्था सक्षमपणे काम करू शकेल.”

शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी आपल्या भाषणात शाळेच्या कार्याची माहिती दिली. शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून मूल्यवर्धन, उपक्रमावर आधारित शिक्षण यामाध्यमातून देशाचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “संस्थेने आपल्या विस्ताराबरोबरच शिक्षण आणि संस्कार यावर कायमच भर दिला आहे. संस्थेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार आपण आता क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.”

 

 

 

 

 

Scroll to Top
Skip to content