माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभात बोलताना मा. डॉ. अनुराधा ओक. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (डावीकडून) इंजि. सुधीर गाडे, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. प्रदीप नाईक, डॉ. भरत व्हनकटे.

“आपल्या देशात प्राचीन काळापासून माणूस हा शिक्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. एक चांगला माणूस म्हणून जगाने मला ओळखले पाहिजे अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे यापुढे आपल्याला मूल्यांविषयी तडजोड करून चालणार नाही, वेळप्रसंगी ती विद्यार्थ्यांच्या गळी उतरवावी लागतील. व्यक्तिगत विकास कसा साधायचा हे आपल्याला चांगले समजते परंतू सामुहिक पातळीवर हित कसे साधायचे ते शिकविण्याची गरज आहे. त्याचा अभाव असल्याने आज समुहाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसे समाजात दिसत नाहीत. शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शहाणपणाचे महत्व यापुढील काळात महत्वाचे ठरणार आहे. ज्ञान मिळविण्याचे अनेक मार्ग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असताना शिक्षकाचे महत्त्व काय आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षक हा समाजाचा कणा आहे कारण चांगली व्यक्ती घडविणारे अदृश्य हात हे शिक्षकाचे असतात. विद्यार्थी निरिक्षणातून शिकत असतात, त्यामुळे शिक्षकांनी आत्मपरिक्षण करणे आणि आपल्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे विभागाच्या सचिव मा. डॉ. अनुराधा ओक यांनी आज (सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३) येथे केले.

मार्च २०२३ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये पार पडला, या प्रसंगी त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि म.ए.सो. चे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यापीठावर उपस्थित होते.

माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत डॉ. मानसी भाटे, डॉ. संतोष देशपांडे, इंजि. सुधीर गाडे, सीए राहुल मिरासदार, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, डॉ. अनुराधा ओक, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. प्रदीप नाईक, डॉ. भरत व्हनकटे, सचिन आंबर्डेकर

इ. १० वी च्या परीक्षेत संस्थेच्या शाळांमध्ये प्रथम आलेल्या १७, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण णिळवलेल्या ४६ विद्यार्थ्यांचा तसेच इ. १२ वी च्या परीक्षेत संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रथम आलेल्या २०, एखाद्या विषयात शंभर टक्के गुण मिळवलेल्या ६ आणि मएसो ज्ञानवर्धिनी परीक्षेत यशस्वी ठरलेले १२ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रथमेश कडलग, सौम्या दंडगव्हार, प्रतिक्षा पवार, रमा इटकीकर आणि प्रशांत सावंत या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, जीवनात यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने परिश्रम करावे लागतात. एखादा विषय समजून घेतला तर त्याविषयाची गोडी लागते त्याचप्रमाणे स्वतःला ओळखता आले, तर आपल्यात सुधारणा घडवून आणणे सहज शक्य होते.

म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका दिपाली बधे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Scroll to Top
Skip to content