विद्यार्थी घडवण्याचे फडके विद्यालयाचे कार्य ‘मएसो’च्या परंपरेला साजेसे

“आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार शाळा वाटचाल करीत आहे. संस्थेच्या सर्वच शाखांप्रमाणे फडके विद्यालयात देखील विद्यार्थी घडवण्याचे कार्य समर्थपणे सुरू आहे. विद्यालयाच्या या कामात  संस्थेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांना आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आज (शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३) विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. आनंदी पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाला सनोफी हेल्थकेअर या कंपनीत सिनिअर सायंटिफिक राईटर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मानसी कुलकर्णी – दाते व मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मृण्मयी खांबेटे या माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या शालासमितीचे अध्यक्ष मा. श्री. देवदत्त भिशीकर, शालासमितीचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, माध्यमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग – इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मानसी कुलकर्णी या प्रसंगी बोलता म्हणाल्या की मराठी माध्यमात शिकल्याचा अभिमान वाटतो आणि संशोधन कार्यात कधीही त्यामुळे अडसर आला नाही. ॲड. मृण्मयी खांबेटे यांनी आपल्या मनोगतातून, आत्मविश्वासाने भविष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.

“१८६० साली सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा कार्यविस्तार फडके  विद्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात उत्तमपणे होत आहे. विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध विद्यालयाशी अधिक दृढ होतील यासाठी विद्यालयाने प्रयत्न करावेत,” असे आवाहन मा. देवदत्त भिशीकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संवाद साधताना मा. डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “ २५ वर्षांपूर्वी विद्यालयाने सुरू केलेला हा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध आहे, असंख्य व्यक्तींचे त्यात योगदान आहे. भविष्यात देखील ज्ञानदानाचे हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहील.”

या कार्यक्रमात विद्यालयाचे ध्येय अधोरेखित करणाऱ्या ‘लोगो’ चे प्रकाशन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून मुष्टीधान्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संकलित केलेले १ हजार ५०० किलो तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात आले.

विद्यालयाच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाचे हितचिंतक, स्नेही, पालक , माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले.

पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.