श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पुण्यातील अन्य शिक्षण संस्था तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ, राष्ट्रीय मनुष्यबळ विकास नेटवर्क (पुणे) व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात ‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोथरूडमधील सूर्यकांत काकडे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या छात्रांनी आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या विशेष घोष पथकाने गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना मानवंदना दिली. श्री श्री रविशंकर यांनी या मुलींचे कौतुक केले.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद अर्थात ‘नॅक’चे अध्यक्ष मा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच विविध शिक्षण संस्थांच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची उंची वाढवली.
गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १ लाख ५० हजार युवक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांचे चालक यांना मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याची शपथ दिली.
एवढ्या प्रचंड संख्येने झालेला देशाच्या इतिहासातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने लंडन, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली.
नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि अन्य शिक्षण संस्थांशी या वेळी सहमतीचा करार करण्यात आला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्वयंसेवकांसह एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिनिधी आणि त्यांच्या गटातील शेकडो सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यश उंचावण्यासाठी अथक परिश्रम केले.
‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमातील गुरूदेव श्री श्री रविशंकर यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मकतेचा अनुभव आला व मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा मिळाली अशी प्रतिक्रिया शेकडो विद्यार्थी आणि सहभागी झालेल्या मान्यवरांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचा विकास आणि प्रगती या दिशेने टाकलेले हे एक लहानसे पाऊल असून देशभरातील शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन ‘एड्यू यूथ मीट’चे आयोजन करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.