‘बाशिम’ गावात लहानग्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता शाळेच्या शताद्बी पूर्तीनिमित्त आयोजन

चावडीवर दोघा भावांचा तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे ‘वासुदेव’, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या महिला, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन् बैलगाडी हे सारे अवतरले ‘बाशिम’ गावात!

ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ‘बाशिम’ गाव डेक्कन जिमखाना परिसरात भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिरच्या प्रांगणात साकारण्यात आले आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त हे गाव साकारण्यात आले असून दि. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२३ असे दोन सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, प्रसिद्ध गायिका आसावरी गाडगीळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या ‘बाशिम’ गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृती यांचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि त्यांना होणारा आनंद आपल्या ग्रामीण संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारे होते.

‘बाशिम’ गाव या उपक्रमाबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात इ. १ ली ते ४ थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.”