मनातील जिद्द, सातत्यपूर्ण सरावाने खेळाडू घडतो
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांचे मत; ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे उद्घाटन
“खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर आपल्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. खेळात हार-जीत होणे, यापेक्षाही खिलाडूपणाची भावना मोठी असते. तुमच्या मनातली खेळाविषयीची जिद्द आणि सरावातील सातत्य टिकवून ठेवा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यातूनच एक चांगला खेळाडू घडतो”, असे मत छत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मिहीर आंब्रे यांच्या उपस्थितीत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, मएसो क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिहीर आंब्रे यांनी स्पर्धेचा शुभंकर ‘वीर’ आणि फुगे सोडून, तसेच ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले.

मिहीर आंब्रे म्हणाले, “तुमच्याएवढाच छोटा असताना, खेळांची वाट पहायचो. खेळ आपल्याला शिस्त शिकवतात, खिलाडूपणा, एकाग्रता वाढवतात. खेळताना विकसित झालेली कौशल्ये आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगी पडतात. शालेय वयातच क्रीडा संस्कृती रुजली, तर आपल्याला मोठेपणी कोणताही खेळ खेळता येतो. खेळ जिंकण्यापेक्षा अधिक उत्कृष्ट कसा खेळता येईल, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, मिहीर यांच्या क्रीडाप्रेमाची सुरवात इथे शाळेतच झाली. आज त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवले आहे. असा आदर्श घेतला पाहिजे. मनात जिद्द ठेवा आणि ध्यास घ्या. जीवनाच्या सर्व क्षेत्रात तो उपयोगी पडतो.
मिहीर आंब्रे बालशिक्षण मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने, त्यांनी व्यासपीठीय औपचारिकता बाजूला ठेवत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सर्व छोट्या खेळाडूंशी संवाद साधत जीवनातील खेळांचे महत्त्व समजावून सांगितले.
प्रास्ताविकात विजय भालेराव यांनी स्पर्धा पर्यावरणपूरक असल्याचा उल्लेख केला. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून संस्थेव्यतिरिक्त अन्य पाच शाळांचा सहभाग स्पर्धेत आहे. खेळ शिस्त, संघभावना निर्माण करतात, असे ते म्हणाले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
