मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन
महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये तयार करण्यात आलेल्या गणित प्रयोगशाळेचे उद्घघाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. प्रशालेचे माजी विद्यार्थी स्व. श्री. दिलीप ताटके यांची पत्नी श्रीमती दिपा ताटके, माजी विद्यार्थी डॉ. सुनिल दिनकर पटवर्धन तसेच श्रीमती मृदुला पायगुडे, सौ. सीमा गुप्ते-पाटील यांनी दिलेल्या निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सीए श्री. राहुल मिरासदार, प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे, संस्थेचे सचिव डॉ. श्री. अतुल कुलकर्णी व संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच ताटके कुटुंबिय उपस्थित होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गणित प्रयोगशाळेचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून गणित शिकण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, विद्यार्थ्यांनी जिज्ञासूवृत्ती ठेवून अभ्यासात प्रगती करावी तसेच गणित प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करावा तसेच गणित विषयाची भीती न बाळगता प्रयोगशाळेच्या माध्यमातून गणित अधिक सोपे व रंजक बनवावे, असा सल्ला दिला.
प्रशालेतील शिक्षिका सौ. मेघना देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशालेतील शिक्षिका श्रीमती लता टिळेकर यांनी केले.
