महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६ बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”
संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.