विविधतेतील एकात्मता मांडत गुंजला देश राग

पुणे, दि. १३ : संगीतातील रागरागिण्यांनी एका सूत्रात गुंफलेल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे दर्शन ‘गुंजे बनकर देश राग’ या कार्यक्रमातून आज झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि मएसो कलावर्धिनी यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ गायिका सौ. अंजली मालकर यांचे गायन,   पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम गायन आणि नृत्याविष्कारातून उत्तरोत्तर रंगत गेला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, मा. आनंद कुलकर्णी, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकावून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र या भागात सौराष्ट्री या नावाने प्रचलित असलेला राग कालांतराने सोरट आणि नंतर देश या नावाने ओळखला जाऊ लागला. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य दाविती सकल रुप’ हे वर्षभरातल्या ऋतूंचे वर्णन करणारे काव्य असो, प्रत्येक भारतीयाच्या मनात रुंजी घालणारे आणि विविध भाषांचा समावेश असलेले ‘गुंजे बन कर देश राग’ हे गाणे असो, संत कबीरांची रचना ‘चदरिया झिनी रे झिनी’ असो, प्रार्थना म्हणून गायले जाणारे ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत असो किंवा होरीच्या नृत्यातून आणि ख्याल गायनातून देश राग विविध भावना आणि संस्कार घेऊन आपल्या भेटीला येतो. त्याचा अनुभव या कार्यक्रमात सादर झालेल्या गायन आणि नृत्याविष्कारातून मिळाला.

सौ. अंजली मालकर यांनी सादर केलेली बड्या ख्यालातील ‘रे मोरा मन हर लिनो’ ही रचना तसेच विरह आणि शृंगाराचा मिलाफ असलेली ‘घन गगन घन घुमड की नो’ ही छोटा ख्यालातील बंदिश देश रागाची चंचलता सांगणारी होती.

देश रागात संगीतबद्ध केलेला ‘चतरंग को गावे रसरंगत सो’ हा नारायणी कुलकर्णी या विद्यार्थिनीने गायलेला तराणा, ईशान मोडक या विद्यार्थ्याने सादर केलेले ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा तेजाने’ हे गीत आणि कृष्णचैतन्य सराफ याने गायलेले ‘आवोनी पधारे म्हारे देस’ हे राजस्थानी लोकगीत तसेच सौ.श्रुती जोशी आणि विद्यार्थिनीनी गायलेले बैजुबावरा चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले ‘दूर कोई गाए धून ये सुनाए’ या गाण्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.

पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांनी होरी नृत्यासाठीच्या बांधलेल्या बंदिशीवर प्रा. सुखदा दीक्षित तसेच प्रा. अबोली थत्ते आणि विद्यार्थिनींनी केलेले सादरीकरण गायन, वादन आणि नृत्य यांचा प्रभावी अविष्कार होता.

या कार्यक्रमात प्रा. आदित्य देशमुख यांनी तबला, हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्य, श्रीमती निवेदिता मेहेंदळे यांनी पखवाज, ओंकार पाटणकर यांनी सिंथेसायझर आणि देवेंद्र देशपांडे यांनी हार्मोनिअमवर साथसंगत केली.

‘वंदे मातरम्’च्या सामुहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रश्मी देव आणि ऋषिकेश करदोडे यांनी केले.