महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या वतीने ‘संगीतातील घराणी आणि सादरीकरण’ या विषयावर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विकास कशाळकर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. म.ए.सो. मुलांचे विद्यालयातील (पेरुगेट भावे हायस्कूल) डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात शनिवार, दि. २७ जुलै २०१९ रोजी दोन सत्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेपूर्वी शास्त्रीय संगीतातील घराणी, मूळपुरुष आणि गुरु-शिष्य परंपरा, वेगवेगळी वाद्ये आणि वादक, जेष्ठ नृत्यांगना, याबरोबरच जेष्ठ नाट्यकर्मी अशा वेगवेगळ्या आशयानुसार तयार केलेल्या ‘फोटो आर्ट गॅलरी’चे उद्घाटन पं. कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव श्री. सुधीर गाडे. महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे उपस्थित होते.

या कार्यशाळेत शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर, आग्रा, जयपुर आणि किराणा या घराण्यांचा इतिहास, प्रत्येक घराण्यानुसार सादरीकरणातील वैविध्य, सौंदर्यमूल्यांविषयी सप्रयोग व्याख्यानातून जिज्ञासू रसिकांना घरंदाज बंदिशी, स्वरलगाव, रागबढतीतील विविध टप्पे या विषयांवर यथासांग माहिती मिळाली.

पुणे शहराबरोबरच विविध गावातील संगीत अभ्यासक या कार्यशाळेला उपस्थित होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अबोली थत्ते यांनी तर महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी प्रा. सुखदा दीक्षित, प्रा. अबोली थत्ते, छाया ढेकणे व श्री. विक्रम खाटपे यांनी परिश्रम घेतले.

Scroll to Top
Skip to content