महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने नव्याने सुरू केलेल्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’च्या कार्यालयाचे उद्घाटन ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते गुरुवार, दि. ४ जुलै २०१९ रोजी करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, बाबासाहेब शिंदे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, सुधीर भोसले, विनय चाटी, गोविंद कुलकर्णी,संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके, सहाय्यक प्रबंधक अजित बागाईतकर आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रणी आहे. समाजात असलेली विविध कलांची आवड लक्षात घेऊन संस्थेने ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’ची स्थापना केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य या पैकी कोणत्याही एका कला प्रकाराची निवड करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा वास्तूमध्ये विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र रियाज खोली, प्रात्यक्षिक वर्ग, साउण्ड लायब्ररी, प्रोजेक्टर खोली, कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभागृह अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून येत्या काही काळात संगीत, नृत्य आणि नाटयाशी निगडीत अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.

Scroll to Top
Skip to content