‘मएसो’ आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज’ यांच्यात कौशल्य प्रशिक्षणविषयक सामंज्यस्य करार

 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यादरम्यान कौशल्यविषयक प्रशिक्षणासाठी सामंज्यस्य करार करण्यात आला. त्या नुसार उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण, जर्मन भाषा, मोडी लिपी, मुद्रित शोधन इत्यादी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत या अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रत्यक्ष कार्यानुभवावर भर देण्यात येणार आहे. हे अभ्यासक्रम १८ ते ८० पर्यंतच्या वयोगटासाठी उपलब्ध राहणार आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या करारावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, प्रा. डॉ. तनुजा देवी, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लि.चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, प्रा. डॉ. गणेश राऊत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि करिअरविषयक संधीचा लाभ घेण्यासाठी ते सक्षम व्हावेत या साठी विविध कोर्सेस, कार्यशाळा, लाईफ स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम, सॉफ्ट स्कील प्रशिक्षणाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, स्टॉक मार्केटविषयक प्रशिक्षण आणि अन्य कौशल्यविकसन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.

Scroll to Top
Skip to content