“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची पुण्याई आणि गेल्या १६५ वर्षांची तपश्चर्या यांच्या बळावर संस्थेला आपल्या कार्यात यश मिळत आले आहे आणि नांवलौकिक प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत, मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यापीठांची कॅम्पस सुरू होत आहेत. ‘मएसो’समोर निर्माण होणाऱ्या अशा आव्हानांबरोबरच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम, कौशल्यविकास, विकासामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक गरजा अशा विविध स्वरुपाच्या संधी उपलब्ध आहेत,” अशा शब्दात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या भावी वाटचालीविषयी भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६५ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे माजी प्रबंधक श्री. अनिल जोशी, निवृत्त उप-प्रबंधक श्री. अजित बागाईतकर, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी श्री. सुधीर दाते यांनी शद्बबद्ध केलेल्या ‘मएसो’च्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या भावे प्राथमिक शाळा, रेणुका स्वरुप प्रशाला आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या तीन शाळांमधील निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी मुखोद्गत केलेल्या श्रीमद्भगवद्गीतेमधील १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठन केले. नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. दिलीप शेठ यांनी या अध्यायाचे विवेचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले. काळानुरुप वाटचाल करत असताना संस्था आपल्या संस्कृतीला अनुसरून विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. भौतिक साधनांमध्ये वाढ होत असताना संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले, “संस्थेचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जात असताना सद्यःस्थितीतील आव्हाने आणि संधी यांचा मागोवा घेण्याची गरज आहे. संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या १६५ वर्षांमध्ये झालेला पुणे शहराचा विस्तार आणि संस्थेचा विस्तार याचा विचार करता संस्थेच्या कार्याचा अजूनही विस्तार होण्याची गरज आहे. परदेशी विद्यापीठांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन हा विस्तार केला पाहिजे. संस्थेच्या प्रयत्नांना समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयात झालेल्या शंभर टक्के प्रवेशांवरून दिसून आले आहे. इंजिनिअरिंग कॉलेजप्रमाणेच लोटे – घाणेखुंट येथील परशुराम हॉस्पिटलसाठी देणगीदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन कोटी रुपयांचा निधी उभा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक बांधिलकीमुळे समाजातील विविध घटकांना संस्थेशी निगडीत होण्याची इच्छा आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय पातळीवर आज अतिशय सकारात्मक वातावरण आहे. या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. त्यामुळेच संस्थेतील प्रत्येक घटकाने संस्थेच्या विस्तारासाठी प्रयत्न करावा. संस्थेला १७५ व्या वर्षी एक वेगळी उंची प्राप्त झालेली दिसेल.”

मा. श्री. प्रदीप नाईक आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेच्या वाटचालीत गेले एक वर्ष अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप मोठे यश संस्थेला मिळाले आहे. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करणे अद्याप बाकी आहे. क्रीडा आणि कृषी या क्षेत्रांचा त्यादृष्टीने विचार केला पाहिजे. शेतीचे घटणारे प्रमाण रोखण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करता येऊ शकते.

या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील आपत्ती निवारणासाठी संस्थेच्या विविध शाखांमधील कर्मचाऱ्यांनी जमा केलेला ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मा. भूषण गोखले यांच्या हस्ते सेवा भारती या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे आपत्ती निवारण प्रमुख श्री. सदानंद कुलकर्णी यांच्याकडे सुपुर्द केला. श्री. कुलकर्णी यांनी सेवा भारतीतर्फे सुरू असलेले आपत्ती निवारण कार्य आणि निधीचा विनियोग याविषयी माहिती दिली.

संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त कर्मचारी श्री. वामन शेंडे दरवर्षी संस्थेच्या वर्धापनदिनी कृतज्ञतेच्या भावनेने संस्थेला निधी देतात. त्यांनी दिलेल्या निधीचा धनादेश मा. बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. तसेच संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य डॉ. निर्भय पिंपळे, डॉ. नेहा देशपांडे आणि सौ. प्रणिती जोगळेकर यांनी देखील आपला निधी मा. गोखले सरांकडे सुपुर्द केला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content