महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाराव्या ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या बेसबॉल खेळाडू कु. रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे होते.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, संस्थेचे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि मा. राजीव देशपांडे , मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्था समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे या देखील या वेळी उपस्थित होत्या. ही स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत प्रमुख पाहुण्या रेश्मा पुणेकर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

“विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवले पाहिजे. बंद खोलीतील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा. खेळातून आरोग्य तर सुधारतेच पण मन, मेंदू आणि मनगटाचा विकास होतो. खेळाच्या माध्यमातून देखील चांगले करीअर करण्याच्या संधी असतात,” असे विचार मा. कु. रेश्मा पुणेकर यांनी मांडले.

“इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणात ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा भरवून ‘मएसो’ ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात वेळ वाया न घालवता त्याकडे पाठ फिरवून मैदानावर यावे,” असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले.

या स्पर्धेत सात जिल्ह्यांतील ‘मएसो’ च्या प्राथमिक शाळा तसेच बारामती शहर व परिसरातील सतरा प्राथमिक शाळांमधील बाराशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सूर्यनमस्कार, डॉजबॉल, गोल खो-खो, लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’तील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. अनेक सामने अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचेही झाले.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मएसो क्रीडावर्धिनीचे सदस्य, शाला समितीचे सदस्य, शाळेच्या सल्लागार समितीचे सदस्य, माजी शिक्षक, पालकवृंद, सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर घोडे यांनी तर आभार प्रदर्शन मा. सुधीर भोसले यांनी केले.

Scroll to Top
Skip to content