सलग सहाव्या वर्षी जिंकला म. ए. सो. क्रीडा करंडक

येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो आणि सूर्यनमस्कार या खेळांचे मुले आणि मुली अशा दोन गटात एकूण ८५ सामने खेळवले गेले. त्यातून २४ सांघिक आणि
आक्रमक, संरक्षक व अष्टपैलू अशी १८ वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेकडे या स्पर्धेचे यजमानपद होते.
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (रविवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली केरिपले य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते.
या वेळी बोलताना सायली केरिपले म्हणाल्या की, इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेतून भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करणारे यशस्वी खेळाडू निश्चितच घडतील. आपले आई-वडिल आणि आपले शिक्षक हेच आपल्याला घडवत असतात, सर्व प्रसंगात तेच आपल्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका असा सल्ला त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने तीन दिवस एकत्र राहण्यातून तुम्हाला स्वावलंबन, वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, त्या कोणत्याही पुस्तकात शिकायला मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या.
प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांवर उत्तमोतम संस्कार करण्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. खेळण्यातून मन आणि मनगट मजबूत होते, त्याचबरोबर आयुष्यदेखील समृद्ध होते. खेळताना अंगाला लागणारी माती देखील आपल्याला काही शिकवत असते, त्यामुळे खेळण्याची सवय कायम ठेवा. खेळताना पडा, रडा पण कायम हसत राहा. म.ए.सो. करडंक स्पर्धेतील विजेत्यांचे आणि त्याचबरोबर ज्यांना यश न मिळालेल्या दोघांचेही मी अभिनंदन आणि कौतुक करतो.
म.ए.सो. करडंक स्पर्धेचे सुरवातीपासून काम पाहणारे म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे यांचा प्रदीप नाईक यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळाचे सामने बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. संध्याकाळच्या वेळेत प्रकाशझोतात झालेले सामने खूपच चित्तवेधक होते. लहान खेळाडूंचा एकत्र निवास असणारी ही राज्यातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक व अन्य सहकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली.
सुधीर भोसले यांनी प्रमुख अतिथी सायली केरिपले यांचा परिचय करून दिला.
विजय भालेराव यांनी पुढील वर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धा बारामती येथील म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी केली.
या स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या म.ए.सो. क्रीडाविश्व या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले.