लहानग्यांच्या चैतन्याने भारलेल्या वातावरणात म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धेला सुरवात

सासवड, दि. २० –  लंगडीच्या सामन्यात एकाच दमात जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी मएसो क्रीडा करंडक स्पर्धेतील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. निमित्त होते,  म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाचे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश असतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून या वर्षी ही स्पर्धा सासवड येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. आज (शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरवातीला यशराज लांडगे या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या पथकाने धावत आणलेली क्रीडा ज्योत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्य हस्ते क्रीडांगणावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेच्या ध्वजाचे अवतरण करण्यात आले. तसेच तन्मयी कोकरे या विद्यार्थिनीने उपस्थितांना क्रीडा शपथ दिली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लंगडी, खो-खो, डॉजबॉल या सारख्या सांघिक खेळांमधून संघभावना वाढीस लागते, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृत्ती विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खेळांमुळे शारीरिक क्षमता विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मैदानाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे. देश-विदेशातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

बाबासाहेब शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म.ए.सो. च्या १६२ वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेताना म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

दि. २२ जानेवारी २०२३ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

विजय भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले.

 

.