घाणेखुंट – लोटे परिसरातील नागरिकांना एम. इ. एस. ए. एम. परशुराम रुग्णालयातर्फे दिल्या जात असलेल्या उत्तम आरोग्यसेवेची दखल घेत डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीने रुग्णालयाला दिलेल्या देणगीतून रुग्णालयात अद्ययावत डिजिटल एक्स-रे मशिन उपलब्ध झाले आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते बुधवार, दि. १३ एप्रल २०२२ रोजी करण्यात आले. डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी श्री. जयंतराव शेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. विवेक कानडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इंजिनिअर  सुधीर गाडे, डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीचे प्रतिनिधी श्री. जयंतराव  शेठ, रुणालयाचे अधिक्षक डॉ. शाम भाकरे, उपअधिक्षक डॉ. अनुपम अलमान, एम. इ. एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन उत्पात, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री. मिलिंद काळे, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परशुराम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या इतिहासाचा मागोवा घेतला. ८०० स्क्वेअर फूट जागेत सुरु झालेल्या  परशुराम रुग्णालयाची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आजवर दुर्लक्षित व उपेक्षित राहिलेल्या भागात शिक्षण तसेच वैद्यकीय सुविधा पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करीत आहे. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदत करीत आहेत. डाऊ अॅग्रो व इतर कंपन्यांनी दिलेल्या मदतीचा विनियोग त्यांना अपेक्षित असलेल्या रुग्णसेवेच्या कामाकरिताच केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

डाऊ अॅग्रो आणि एम. आय. डी. सी. मधील कर्मचारी वर्गास इ. एस. आय. योजनेअंतर्गत या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी अशी इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रमुख पाहुणे श्री. जयंतराव शेठ यांनी दिले.

सी. एस. आर. फंडातून समाजोपयोगी विविध उपक्रमांना डाऊ अॅग्रो कंपनी व परिसरातील इतर कंपन्यादेखील वेळोवेळी मदत करतात. कोविड प्रदुर्भावाच्या काळात डाऊ अग्रो, सुप्रिया केमिकल्स, घरडा, गोदरेज इ. विविध कंपन्यांनी रुग्णालयास आर्थिक व वस्तुरूप सहाय्य केले. त्याबद्दल संचालक डॉ.शाम भाकरे यांनी या वेळी कृतज्ञता व्यक्त केली.

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे डॉ. विवेक कानडे यांनी या प्रसंगी सांगितले.

१६१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २००७ साली घाणेखुंट – लोटे येथे परशुराम रुग्णालयाची स्थापना केली. पंचक्रोशीतील रुग्णांना सवलतीच्या दारात उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून रुग्णालय व संस्था सतत प्रयत्नशील आहे.

Scroll to Top
Skip to content