‘एमईएस आयएमसीसी’ला ‘कॉमनवेल्थ एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान

कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड रिसर्च या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पुण्यातील सर्वोत्तम शिक्षण संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसला (‘एमईएस आयएमसीसी’) प्राप्त झाला आहे. ‘एमईएस आयएमसीसी’चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी रविवार, दि. १७ एप्रिल २०२२ रोजी पुण्यात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते तो स्वीकारला.

उद्योग, शिक्षण, व्यवसाय आणि सेवा क्षेत्राशी निगडीत विविध गटांत काम करणाऱ्या भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, शिक्षणतज्ञ आणि व्यक्ती यांचा ‘कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी विचार केला जातो.

कठोर परिश्रमातून प्राप्त केलेल्या श्रेष्ठतेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणारा हा मानाचा पुरस्कार प्रभावी आणि संवेदनशील व्यावसायिकतेची दिशा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सृजनात्मक कामगिरी आणि योगदानाला पोचपावती मिळवून देणारा पुरस्कार आहे.

व्यक्ती आणि संस्थांची भूमिका, त्यांची क्षमता आणि कार्य यांना प्रोत्साहन देऊन नावीन्यपूर्ण कार्यपद्धती आणि प्रतिभाशाली उपाययोजना यांच्या आदान-प्रदानाद्वारे युवा पिढीला शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या पुरस्कारच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते.