‘नवोन्मेष’ हॅकेथॉन उत्साहात संपन्न

‘नवोन्मेष – २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आसाम, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली आणि चंडीगड यांसारख्या राज्यांमधील सुमारे १३०० स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.

‘नवोन्मेष’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, एमईएस मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व उद्योजक अजय पुरोहित आणि किन्नयशोदा सामाजिक संस्थेच्या संस्थापक सौ. सुमेधा संभाजी लिह्मण यांच्या हस्ते करण्यात आले. किन्नयशोदा सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक यश प्रशांत पाटील यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती.

आरोग्यसेवा, शाश्वत विकास, फिनटेक, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक अशा विविध क्षेत्रांशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी सादर केले. आयसिनर्जी, व्हीफोर्सी, स्किली, ओरॅकल अप्लिकेशन्स, बीएनवाय मेलन आणि मिअरस टेक्नॉलॉजीज यांसारख्या अग्रगण्य संस्थांमधील अनुभवी तज्ज्ञांमार्फत या प्रकल्पांचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या प्रकल्पांची उपयुक्तता आणि परिणामकारकता तसेच त्या संदर्भातील व्यावहारिक दृष्टीकोन समजला.

ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती, तीन कठोर फेऱ्यांमध्ये ती पार पडली. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि समस्या सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेला अधिकाधिक आव्हान देण्यासाठी प्रत्येक फेरीची रचना करण्यात आली होती. अंतिम फेरीत निवडक संघांनी आपल्या अभिनव कल्पना आणि कार्यक्षम प्रोटोटाइप सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पारदर्शक मूल्यमापन पद्धती आणि उद्योग क्षेत्राशी परिपूर्ण सहकार्य यामुळे नवोन्मेष हॅकेथॉनने नवकल्पनांना चालना देणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आरोग्यसेवा, शाश्वतता, फिनटेक, ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योग-प्रेरित समस्यांची काळजीपूर्वक निवड ही नवोन्मेष ची खासियत असून त्यामुळे या हॅकेथॉनची उपयुक्तता आणि परिणामकारकता ठळकपणे दिसून येते.

‘नवोन्मेष’चा समारोप आयसिनर्जीचे संस्थापक अतुल ठोंबरे, शिक्षणतञ डॉ. अमोल गोजे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय भालेराव तसेच एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘नवोन्मेष – २०२६’ हा उपक्रम परिवर्तनशील विचारांना प्रोत्साहन देत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्यकालीन नेतृत्वाची पायाभरणी करणारा ठरला आहे.

 

Scroll to Top
Skip to content