पुणे, २ ऑगस्ट : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे काल रात्री उशीरा पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गावडे यांनी अनेक शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या कार्यात पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक व देणगीदार म्हणून अमूल्य योगदान दिले आहे.
प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म २० जून १९२४ रोजी नेवासे येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९५० मध्ये ते बी.टी. झाले. पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते १९५२ मध्ये एम.ए. आणि १९५६ मध्ये एम.एड झाले.
‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. संपादन केली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट प्रबंधाबद्दल ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. तसेच, १९७१ – ७२ मध्ये या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. ‘मराठी-वाङ्मय’ हा त्यांचा अध्यापनाचा विषय होता. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद तसेच ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय होते आणि त्यावर ते व्याख्याने देखील देत असत.
प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी १९४६ ते १९८२ या प्रदीर्घ कालखंडात अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. १९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले.
डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. संस्थेच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मएसो मुलांचे विद्यालयातील (पूर्वीची भावे स्कूल) सभागृहाचे ‘गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. तसेच मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’ चे उद्घाटन डॉ.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सन २०१७ मध्ये ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला डॉ. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले होते.
शालेय शिक्षण, विद्यार्थ्यांसाठीच्या ‘साहित्यविहार’, ‘कथाकौस्तुभ’ या पुस्तकांचे संपादन तर ‘शालेय मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. ९ वी, ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन देखील त्यांनी केले होते.
डॉ. प्र. ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक – राज्य पुरस्कार’ (१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र. ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभात शनिवार, दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. गावडे यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते डी.लिट्. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करून डॉ. गावडे यांचा सन्मान केला.
डॉ. प्र. ल. गावडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्या वेळी ‘अमृतसंचय’ हा ‘डॉ. प्र. ल. गावडे अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य प्रा. डॉ. प्र.ल.गावडे यांना विनम्र श्रद्धांजली!