बारामुल्लातील महिलांना फॅशन डिझाइनिंगचे प्रशिक्षण
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ. मानसी भाटे आणि मएसो रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.
सौ. आनंदीताई पाटील यांनी प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले. तसेच मेजर अंकित शर्मा यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधला.
काश्मीर खोऱ्यातील अनेक अडचणींना तोंड देत प्रशिक्षणार्थिंनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. आपल्या भावना व्यक्त करताना, फॅशन डिझाइनिंगच्या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार मिळवणे शक्य होणार असल्याचे काही प्रशिक्षणार्थिंनी सांगितले. तर काही जणींनी या प्रशिक्षणानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, संगीत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक प्रशिक्षणासाठी ‘मएसो’च्या सहकार्यासंदर्भात या वेळी विचारविनिमय करण्यात आला.