पुणे, दि. १३ : “इंजिनीयर होणे म्हणजे केवळ चांगली मशिन्स बनवणे नाही तर चांगले भविष्य घडवणे आहे, परमेश्वराने प्रत्येकाला जग बदलण्याची क्षमता दिली आहे, तुम्ही जे शिकाल त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हातात आहे. आपले करियर घडवत असताना हे लक्षात ठेवा की किंमतीपेक्षा मूल्यांचे महत्व खूप अधिक आहे. प्रामाणिकपणा, सहानुभूती, विनयशीलता आणि चिकाटी या गुणांना कोणतेही सॉफ्टवेअर पर्याय ठरू शकत नाही, मशिनवर ते तयार करता येत नाहीत. बोर्डरूम आणि शॉपफ्लोअर दोन्ही ठिकाणी तुमच्या अधिकारांपेक्षा तुमची पात्रता किती तरी अधिक महत्वाची ठरते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा केवळ कौशल्यांचा विकास होणार नाही तर जीवनाच्या उद्देशाला दिशा मिळणार आहे. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच सामाजिक प्रकल्प, इंटर्नशीप, ओपनसोर्स कम्युनिटीज, उद्योजकता, विक्री आणि आंतरशाखीय संशोधन यामध्ये सहभागी झाले पाहिजे. कारण तिथेच खरे शिक्षण सुरू होते.,” अशा शद्बात किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी इंजिनियरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’चे उद्घाटन किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते आज (सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले उपस्थित होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील एमईएस ऑडिटोरीअममध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला राजकुमार चोरडिया, देवीचंद चोरडिया, मदन जैन, शरद सारडा, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
“तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर आपला देश जगाचे नेतृत्व करू शकतो. देशातील केवळ अतिश्रीमंतासाठी नाही तर सर्व भारतीयांसाठी नवीन संशोधन करणारे इंजिनियर असतील तरच ते शक्य होईल. त्यामुळे भारताला इंजिनियरची गरज आहे. त्यांनी शेतकरी, छोटे व्यवसाय, दूरवर राहणारे लोकसमूह आणि पर्यावरण याच्याशी संबंधीत समस्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे. कारण त्यासाठीच काम करण्याची खरी गरज आहे,” असेही किर्लोस्कर यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाबासाहेब शिंदे यांनी इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्यामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षणाकडे व्यापारी दृष्टीने न बघता विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देते. त्यासाठी संस्थेचे हितचिंतक, समाजातील सज्जनशक्ती कायमच संस्थेच्या पाठीशी उभी राहते. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम लोहिया यांनी या कॉलेजचे दीड लाख स्क्वेअर फूट बांधकाम करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. संस्थेच्या वाटचालीतील ही सर्वात मोठी देणगी आहे. आपल्या देशात चांगेल मनुष्यबळ तयार होते पण ते परदेशात स्थायिक होत असल्याने देशाला त्याचा उपयोग होत नाही. ‘मएसो’च्या इंजिनियरिंग कॉलेजमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा अभिमान निर्माण व्हावा आणि देशाच्या विकासात योगदान देणारे उद्यमी निर्माण व्हावेत आणि विकसनशील भारताला विकसित भारत बनवणारे मनुष्यबळ निर्माण व्हावे हा आमचा उद्देश आहे.”
पुरुषोत्तम लोहिया आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण माणसाला केवळ रोजगार मिळवून देत नाही तर चांगले व विवेकी विचार, संस्कार, नितिमूल्य, कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण करते. लोहिया कुटुंबियांच्या सहकार्याने सुरू झालेले हे महाविद्यालय माझ्या वडिलांच्या नावाने ओळखले जाणार आहे, याचा मला आनंद आहे. ‘मएसो’ च्या शिक्षण क्षेत्रातील इतिहासामुळे संस्थेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळेच या नवीन महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे सर्व प्रवेश पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हे महाविद्यालय केवळ अभियंता घडवणार नाही तर जबाबदार नागरिक, नवनिर्मिती करणारे कृतीशील विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे तरुण तयार करेल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन तर श्रीमती अमिता सोळंके यांनी सूत्रसंचालन केले.
‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष मा. श्री. संजय किर्लोस्कर. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, ‘मएसो’चे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले.
