महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
इ. स. १८७९ मध्ये अटक झाल्यानंतर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यात संगम पुलाजवळील जिल्हा न्यायालयात (सध्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांगणात) राजद्रोहाचा खटला चालू असताना न्यायालयीन कोठडीत (सध्याचे रेकॉर्ड रूम) ठेवण्यात आले व त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास एडन येथील कारागृहात पाठवण्यात आले. १७ फेब्रुवारी १८८३ मध्ये अमानुष छळामुळे एडनच्या तुरुंगात त्यांना स्वर्गवास प्राप्त झाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक असलेले आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इ. स. १८७४ मध्ये पूना नेटीव इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यांनी पुढे संस्थेची जबाबदारी श्री. वामन प्रभाकर भावे व श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्याकडे सोपवून, देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा त्याग व अपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याची संकल्पना मएसो च्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील यांनी मांडली होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख श्री. अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मएसो सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्मारकाची स्वच्छता करून ते फुलांनी सजावले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
या प्रसंगी फडके स्नेहवर्धिनी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. दिगंबर गोपाळ फडके व श्री. दत्तात्रय वामन फडके, तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. चंद्रकांत दत्तात्रय फडके, श्री. चंद्रकांत प्रभाकर फडके, सौ. सुलभा लिमये-फडके व श्री. लिमये आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. तुषार दोषी (भा. प्र. से.), पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, व सौ. दीपाली आढाव, पोलीस निरीक्षक, तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.