पुणे, दि. २१ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून सांघिक ऑनलाईन योगासनांद्वारे आज करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळातील सर्व बंधने पाळून ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम मएसो ऑडिटोरीअम येथे पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक व वेबसाईटद्वारे करण्यात आले. पुणे शहराबरोबरच संस्थेच्या  कासारआंबोली, सासवड, बारामती, शिरवळ, नगर, पनवेल, बेलापूर, कळंबोली, लोटे-घाणेखुंट येथील विविध शाखांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्चमारी आणि हितचिंतक अशा सुमारे २५ हजार जण त्यात सहभागी झाले होते. त्यांनी योग प्रात्यक्षिकाचे अनुसरण करत यावेळी सूर्यनमस्कारासह १५ योगासने केली. या प्रसंगी ‘योगाचे महत्व’या विषयी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, मएसो संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास करताना संस्थेचे मान्यवर पदाधिकारी.

श्री. मनोज साळी, श्री. जयसिंग जगताप आणि सौ. सुष्मिता नांदे यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. त्यांचासमवेत संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही योगाभ्यास केला. त्याचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश आपटे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (डावीकडून) ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. अभय माटे म्हणाले की, “योग हा शद्ब युज या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे आणि युज याचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चैतन्य यांना जोडण्याचे काम योग करतो. योगाच्या सरावाने व्यक्तीच्या कर्मात कुशलता येते. ‘योग: कर्म सुकौशलम्’ ही उक्ती साध्य होते. एखाद्या तांब्यामध्ये असलेले सगळे पाणी न सांडता भांड्यामध्ये ओतणे हे कौशल्याचे रोजच्या जीवनातील साधे उदाहरण आहे. कौशल्यामुळे कोणतेही काम करणे सहज शक्य होते. जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी पतंजली ऋषिंनी अष्टांग योग सांगितला आहे. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यातील हितसंबंध राखणे म्हणजे यम त्यासाठी अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य, अपरिग्रह असे पाच भाग आहेत. वैयक्तीक जीवन चांगले राखण्यासाठी शरीर आणि मनाची शुद्धता, स्वाध्याय, ईश्वरभक्तीचा अवलंब करण्यास सांगितले आहे. आसन ही केवळ शारिरीक क्रिया नाही तर शरीर आणि मनाची लवचिकता साधण्यासाठी आसनांची योजना केली गेली आहे. आपला श्वास आणि उत्च्छ्वास यांचे नियमन करण्यासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि आपल्या अंतरंगात जाण्याचा मार्ग सुकर होतो. आपल्या चित्ताला बांधून ठेवणारे धारणा-ध्यान-समाधी यांची योजना अष्टांग योगात आहे. कारण उपलब्ध पर्यायातून निवड करण्याचे कार्य बुद्धी करते परंतू त्याचा नेमकेपणाने उपयोगात आणते ते चित्त. याचप्रमाणे विपर्याय, विकल्प आणि निद्रा यांचा यामध्ये समावेश आहे. निद्रेमुळे चित्ताला विश्रांती मिळते. या सर्व वृत्तींवर ताबा योगामुळेच मिळवता येतो आणि त्यातूनच मोक्ष किंवा कैवल्यप्राप्ती होते. या चित्तवृत्तींमुळेच शिक्षण मिळत असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने योग सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो.”

मा. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “ज्ञानसंवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेऊन संस्थेने क्रीडावर्धिनीची स्थापना केली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणारी ‘मएसो’ ही एकमेव संस्था आहे. निष्णात प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षणाची सोय संस्थेमध्ये आहे. योग सप्ताहाचे आयोजन हा देखील एक असाच महत्वपूर्ण उपक्रम आहे. कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एक महत्वाचा उपचार आहे आणि त्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे, हे लक्षात घेऊन आजपासून योगसप्ताह आयोजित करण्यात आला आहे.”

७ व्या योगदिनाच्या शुभेच्छा देताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “योगाचा अवलंब केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होत आहे. त्यामुळे आज जगभरातील शंभर देशांमध्ये योगदिन साजरा केला जात आहे. प्रत्यक्षात रोजच योगाभ्यास केला पाहिजे.”

मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राही भालेराव यांनी केले. सरस्वती वंदना आणि शांतीमंत्र अपूर्वा साने यांनी सादर केला.

Scroll to Top
Skip to content