“अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणे माणसांच्या जीवनात कलेचे स्थान देखील महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, कला आत्मसात करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते, सातत्याने प्रयत्न केले तर कला साधता येते. त्यामुळे शालेय वयातच कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलेचा संस्कार झालेला माणूस एक चांगला नागरिक होते, त्यातूनच सभ्य समाज निर्माण होतो. म्हणूनच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून होत असलेला कलेचा संस्कार महत्वाचा आहे,” अशा शद्बात ख्यातनाम शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आज (बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४) कलेचे महत्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेत म.ए.सो. कलावर्धिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पकार कांबळे बोलत होते. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कला शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने मात्र यापूर्वीच कलाशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळांमध्ये कलाशिक्षक नसले तरी कलेचा संस्कार व्हावा, विद्यार्थ्यांना कला आत्मसात व्हावी यासाठी म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून गायन, वादन, नृत्य अशा विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक आर्टवॉल उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रंगवेध’ या चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाप्रमाणेच ‘स्वरवेध’ आणि ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामाध्यमातून केवळ शिक्षकच नाहीत तर शाळेच्या परिसरातील कलाकार देखील शाळेशी जोडले जातात. ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी पुणे, बारामती व पनवेल येथील शाळांमध्ये ते आयोजित करण्यात आले होते. शिरवळमध्ये आयोजित करण्यात आलेले ग्रामीण भागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रणिता जोगळेकर यांनी तर पार्थ रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

Scroll to Top
Skip to content