महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त आज सासवड नगर पालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कौटुंबिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणाऱ्या आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचा विशेष सत्कार देखील या वेळी करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधत शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी प्रतिनिधींचाही सत्कार आज करण्यात आला. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी महिला दिनाची माहिती सांगितली.
सासवड शहर आणि विशेषतः शाळेच्या आसपासच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे काम पालिकेच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचारी करीत असतात. सासवड नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि त्यात उत्तम गुण प्राप्त केलेल्या या महिला कर्मचाऱ्यांचा आजच्या कार्यक्रमात सत्कार करून शाळेने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा. श्री. पी. एस. मेमाणे यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले.
आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचे पती आपल्याच शाळेच्या सेवेत होते. त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर श्रीमती सोळंके या गेली १८ वर्षांपासून शाळेच्या सेवेत आहेत. त्या मूळच्या जळगाव येथील आहेत. पतीच्या निधनावेळी २ आणि ४ वर्षे वय असलेल्या आपल्या मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने वाढविले. त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी बी.ई. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कर्तृत्ववान मातेचा सत्कार करून आपल्यातीलच एका आदर्श महिलेचा परिचय शाळेने या निमित्ताने सर्वांना करून दिला.
या कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. मनिषा बडधे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक गणेश पाठक यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. के. राऊत, हि.बा. सहारे तसेच नगरसेवक आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अजित जगताप यांनी सहकार्य केले