आपल्या परिसरात झालेल्या सुधारणा आणि विकासामुळे परिसर बदलतो, त्यात सरकारचे योगदान असते पण माणसात बदल घडविण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि अशा शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे, अशा शद्बात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांना ‘पद्मविभूषण’ हा मानाचा नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी ‘मएसो’च्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांचादेखील मानपत्र देऊन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साबळे यांनी आपल्या खासदार निधीतून मएसोच्या बारामतीतील शाळेसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली.
याप्रसंगी व्यासपीठावर ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, खा. अमर साबळे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमाला भारती साबळे, प्रतापराव पवार, बारामती शहरातील अनेक मान्यवर, स्नेही, मित्रमंडळी आणि बारामती येथील शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. एस.बी. गोगटे तसेच शाळेशी संबंधित अनेक व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात पवार यांनी सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. “एकेकाळी बारामती ही ‘केकावली’ आणि ‘आर्या’ यांची रचना करणाऱ्या कविवर्य मोरोपंतांमुळे ओळखली जात असे. पेशव्यांचे सावकार असलेल्या बाबूजी नाईक यांच्यामुळेही पेशवेकाळात ती ओळखली जायची. साखर कारखानदारीत महत्त्वाची कामगिरी करणारा भाग म्हणून बारामतीची ओळख झाली. आता बारामतीत सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असून शेती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अशा सगळ्याचीच निर्मिती बारामतीच्या परिसरात होते. अशा पद्धतीने परिसर बदलण्यात सरकारचे योगदान असू शकते, मात्र माणूस बदलण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि त्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे. अनेक शिक्षण संस्थांशी माझा संबंध असल्याने तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात गुणात्मक बदल करण्याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा डोळ्यासमोर जी काही ४ ते ५ नावे येतात, ती सर्व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षकांचीच आहेत. शाळेचे मुख्याध्यापक एम.व्ही. भावे, बी.जी. घारे, एस.बी. गोगटे यांच्यासारख्या उत्तम शिक्षकांची ‘मएसो’ ला परंपरा आहे. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले पाहिजेत याची खबरदारी या शाळेतील शिक्षकांनी घेतली. शाळेतल्या शिक्षकांच्या कृतीतूनच संधी येईल तेव्हा साहस दाखवलेच पाहिजे हा संस्कार झाला. आपली मातृभाषा असलेल्या मराठीबद्दलची आस्था शाळेमुळेच निर्माण झाली.
अशा शाळेच्या तीन माजी विद्यार्थ्यांना आणि तेदेखील एकाच घरातल्या तिघांना पद्म पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद घटना आहे आणि मला त्याचा आनंद आहे. माझे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांनी देशांत पहिल्यांदा ठिबक सिंचनाचे तंत्र आणले. शेतीच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे होते, त्यामुळे त्यांना आणि माझे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांना उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्यबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि व्यक्तीगत जीवनातही अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लातूरमध्ये झालेला विनाशकारी भूकंप आणि मुंबईत झालेले बॉम्बस्फोट अशा आव्हानांला तोंड द्यावे लागले. आठ हजार जणांचा बळी घेणाऱ्या भूकंपानंतर लातूर परिसराचे दोन वर्षात पुनर्वसन करण्यात आणि बॉम्बस्फोटांनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जनजीवन अल्पावधीत पूर्वपदावर आणण्यात यशस्वी ठरलो. समाजात चर्चा होईल असा निर्णय काही वेळा राजकीय जीवनात घ्यावा लागतो. आपल्या देशाच्या सैन्यदलात महिलांना प्रवेश नव्हता. संरक्षण मंत्री असताना त्यासंदर्भात संबंधितांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सोपस्कार दूर सारत एक जनप्रतिनिधी म्हणून मी तो निर्णय घेतला. या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व एका महिला लष्करी अधिकाऱ्याने केले याचा मला खूप आनंद आहे. हवाई दलात महिलांना प्रवेश दिल्यानंतर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची नियुक्ती करण्याची शिफारस देखील संरक्षण मंत्री असताना मीच केली होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला, देशातल्या तरुणांबद्दल प्रचंड असणारा, आपल्या वेतनापैकी ९० टक्के रक्कम आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणारा माणूस मला भेटला. अशा अनेक जणांशी माझा संबंध आला. कामाविषयीची तळमळ, बांधिलकी, कष्ट करण्याची तयारी असे सर्व संस्कार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना, संस्कारक्षम वयातच ‘मएसो’च्या शाळेत झाले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. लोकशाहीचा संस्कार रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘मएसो’च्या संस्कारातूनच हे शक्य होईल. आज शाळेने, संस्थेने केलेल्या सत्काराचे महत्व आगळे-वेगळे आहे. हा घरातील सत्कार आहे, जिथे शिकलो त्या शाळेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.” असे पवार आपल्या भाषणात म्हणाले.
खा. अमर साबळे आपल्या भाषणात म्हणाले की, “ संस्थेने माझा आणि पवार साहेबांचा सत्कार केल्याबद्ल मी आभारी आहे. आपण जग जिंकल्यावर जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्या विजयाचा असतो. जगभरचे आदर-सत्कार स्वीकारून जेव्हा गावच्या वेशीवर येतो आणि गावातले जेव्हा स्वागताला येतात तेव्हाचा आनंद जास्त असतो, तसाच आनंद आझ मला होतो आहे. पवार साहेबांपेक्षा दुप्पट आनंद आझ मला होतो आहे कारण त्यांच्याबरोबर माझा सत्कार होत आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. बारामतीत शंभर वर्षापूर्वी जेव्हा शाळा सुरू झाली, त्याने बारामतीतील शिक्षणाचा पोत, गुणवत्ता आणि पिढी सुधारली. मएसोची शाळा म्हणजे ब्राह्मणांची शाळा असाच समज बारामतीत होता. हा समज चुकीचा होता हे मी अनुभवाने सांगतो. संस्थेतील शिक्षक ब्राह्मण होते पण शिक्षणात आणि संस्कारात ब्राह्मण्यवाद कधीच दिसून आला नाही. आजच्या नवीन वातावरणात नवी शिक्षण निती देता येते का? याचा संस्थेने विचार करावा. चांगले, दर्जेदार, मूल्यशिक्षण, कौशल्य आणि संशोधनावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. पुढील शंभर वर्षांचे शिक्षण कसे असावे ही जबाबदारी आपली आहे.”
या कार्यक्रमात संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे म्हणजेच ‘MAA’ चे सन्माननीय सदस्यत्व शरद पवार, खा. अमर साबळे, प्रतापराव पवार यांना देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या मान्यवरांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
पवार आणि खा. साबळे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. श्यामा घोणसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन डॉ. केतकी मोडक यांनी केले.