म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल दिनार दिघे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे उपस्थित होते. “शौर्य शिबिरामुळे स्वावलंबन, संघटन कौशल्य व आत्मविश्वास हे गुण वाढण्यास निश्चितच उपयोग होईल,” असे सांगून पाल्यांना साहसी क्रीडा प्रशिक्षणासाठी पाठवल्याबद्दल कर्नल दिघे यांनी पालकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून चालणाऱ्या शैक्षणिक कार्याबरोबरच विविध उपक्रमांची माहिती प्रा. आपटे यांनी दिली. ‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबर रोजी १५९ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण प्रा. भोसले यांनी उपस्थितांना दिले. सैनिकी शाळेतर्फे दि. १२ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये रिव्हर क्रॉसिंग, राफ्टिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉल क्लायंबिंग इ. साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुटीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात येते. अशा स्वरुपाचे हे ७ वे शिबिर आहे. यावेळच्या शिबिराचे एक वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच राजस्थानमधील प्रशिक्षणार्थीदेखील त्यात सहभागी झाले आहेत. सैनिकी शाळेची शाला समिती, शौर्य शिबिराची संयोजन समिती व म.ए.सो चे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येते.

Scroll to Top
Skip to content