महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या प्रांगणातील नूतनीकृत डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृहाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते गुरुवार दि. ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ.संतोष देशपांडे, पनवेलमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. नीलाताई पटवर्धन, शाला समितीचे अध्यक्ष अॅड.जयंत म्हाळगी, शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
मा. नीलाताई पटवर्धन यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या या सभागृहाची आसन क्षमता ३०० असून दोन ग्रीन रूम, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा, अद्ययावत ध्वनिक्षेपण यंत्रणा यांनी हे सभागृह सुसज्ज आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन, सरस्वतीपूजन व संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमा पूजनाने झाली. नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यालयाचे महामात्र डॉ. अतुल कुलकर्णी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला.
मा. नीलाताई पटवर्धन मनोगतात म्हणाल्या, “आम्ही कुटुंबीय म.ए.सो.चे माजी विद्यार्थी असल्यामुळे संस्थेच्या कामाचे कौतुक आहे, संस्थेची ध्येय-उद्दिष्ट्ये आमच्या विचारांशी सुसंगत असल्याने शाळेला देणगी दिली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. भूषणजी गोखले यांनी नूतनीकरण केलेल्या डॉ. पटवर्धन सभागृहाची कल्पना मांडणाऱ्या व साकारणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक केले. नाटक, संगीत अशा कला तसेच खेळांमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, त्या दृष्टीने या सभागृहाचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच नवीन पनवेल परिसरातील हे सभागृह छोटेखानी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी वरदानच ठरेल असे त्यांनी नमूद केले.
यावेळी शाळेच्या ‘संवाद’ या पाक्षिकाचे प्रकाशन मा. भूषणजी गोखले यांचे हस्ते झाले. कु.वैष्णवी कदम हिने या पाक्षिकाचे संपादन केले आहे.
शाला समितीचे अध्यक्ष अॅड. जयंत म्हाळगी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका स्वप्ना अत्रे यांनी केले.
औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर किराणा घराण्याची विख्यात गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत व अभंग गायनाचा ‘सूरसंगत’ हा कार्यक्रम झाला. आपल्या बहारदार गायनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.