पुणे, दि. 19 – लहानग्या खेळाडूंमधला उत्साह, खेळाच्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची वाढती उत्कंठा आणि क्रीडाज्योतिच्या आगमनाने भारलेल्या वातावरणात कौतुकास्पद समन्वयाचा अनुभव देणाऱ्या क्रीडा प्रात्यक्षिकांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’ला आज सुरवात झाली. इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी सई पवारच्या नेतृत्वात सादर केलेल्या कॅलेस्थेनिस या ड्रील व्यायाम प्रकाराने सर्वच उपस्थित अचंबित झाले. एकसंघता, परस्पर समन्वय आणि सरावातून मिळवलेली कुशलता यांचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कॅलेस्थेनिसचे प्रात्यक्षिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या निनादात सुरू झालेल्या लेझमीच्या खेळाने वातावरणात वीरश्रीबरोबरच उत्सवी रंग भरून गेला. पुण्यातल्या रेणुका स्वरुप प्रशालेच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री शिर्के आणि संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज झाले. यावेळी भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड, शाळेच्या महामात्र चित्रा नगरकर, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष भालचंद्र पुरंदरे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष विवेक शिंदे, स्पर्धेचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सहाय्यक चिटणीस डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य आनंदी पाटील तसेच रेणुका स्वरुप प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दाते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 12 शाळांबरोबरच अन्य 3 शाळा सहभागी झाल्या असून लंगडी, गोल खो-खो, डॉजबॉल या खेळांचे सामने होणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर खेळाडूंच्या पथकाने क्रीडाज्योत मैदानात आणली आणि त्यानंतर मैदानात अवतरला, क्रीडा महोत्सवाचा यावर्षीचा शुभंकर असलेला बाहुबली! त्याला बघून लहानग्या स्पर्धकांमध्ये चैतन्य सळसळू लागले आणि अशा भारलेल्या वातावरणात हवेत सोडण्यात आलेल्या फुग्यांनी क्रीडामहोत्सव सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात, क्रीडा महोत्सवात दरवर्षी वाढत असलेला उत्साह आणि आनंद ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. खेळांमुळे शारिरीक क्षमतेच्या विकासाबरोबरच व्यक्तिमत्वाचाही विकास होत असल्याने खेळातील यश-अपयशाकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री शिर्के या संस्थेच्या रेणुका स्वरुप प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. शाळेतच आपल्या क्रीडा जीवनाला सुरवात झाल्याचे लांगत त्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा करंडक स्पर्धेसारखा एक चांगला मंच उपलब्ध करू दिल्याबद्दल संस्थेची स्तुती केली आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा चांगला फायदा करू घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मएसो क्रीडावर्धिनीचा प्रत्येक क्रीडामहोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शालेय वयातच खेळाची गोडी लागली तर जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्याचा फायदाच होतो आणि खेळाचा दररोज सराव केला तरच खेळण्याचा आनंद लुटता येतो याकडे लक्ष वेधले. भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका रेणुका महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

   

Scroll to Top
Skip to content