“शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका” – डॉ. अनिरुद्ध देशपांडे
“आपल्या हेतूबद्दल स्वच्छ असलं पाहिजे त्यामुळे जीवनाचा उद्देश कळतो, योग्य-अयोग्य काय हे कळलं पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ राखता येतं, जीवनात प्रमाणबद्धता असली पाहिजे त्यामुळे काय बोलावं, कोणाकडे किती वेळ जावे आदी गोष्टी कळतात, विनोदबुद्धी जागृत असली पाहिजे त्यामुळे निर्व्याज्यपणे हसता येतं आणि आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका,” असा आपुलकीचा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
मार्च-एप्रिल २०१६ मध्ये माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १२ शाळांमधील ४४ विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ बुधवार, दि. ३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात (असेंब्ली हॉल) आयोजित करण्यात आला होता. डॉ. अनिरूद्ध देशपांडे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला मा. दिनकर टेमकर शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे – १ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. संजय देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या ईशस्तवनाने झाली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांचा परिचय, स्वागत तसेच प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. २०१५-१६ हे त्याचे पहिलेच वर्ष. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आणि तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रत्येक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मा. टेमकर यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरूपात पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. या मराठी भाषेतील निबंधासाठी कु. अनघा योगेश उबाळे, कु. प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि कु. श्रुतिका महेंद्र कुंडा या तिघांना तर कु. साक्षी सचिन घोलप, कु. सानिका गणेश मोरे आणि कु. सृष्टी तुषार करमळकर या तिघांना इंग्रजी भाषेतील निबंधासाठी पुरस्कार देणात आले. श्री. अजिंक्य देशपांडे यांनी यावेळी या स्पर्धेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करण्यासाठी आणि त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी भारत सरकारच्या वतीने सी.आय.ए.एस.सी. स्पर्धा घेण्यात येते. वाघीरे हायस्कूलचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन यांनी ही स्पर्धा आणि स्पर्धेत शाळेला मिळालेल्या यशाबाबत यावेळी माहिती दिली. दोन स्तरावर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत आपल्या संस्थेच्या सासवड येथील वाघीरे हायस्कूलची पहिल्या स्तरावर निवड झाली होती. २०१६-१७ वर्षासाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या केवळ ३३ शाळांमध्ये वाघीरे हायस्कूलचा समावेश होता. “बौद्धिक स्वामित्त्व हक्क” या विषयावर दिल्ली येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यानंतर शाळेने सादर केलेल्या सुधारित प्रकल्पाला दुसऱ्या स्तरावर देशभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या वैष्णव सुखदेव बारवकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे, श्रेयस गजानन यादव आणि रोहित अनिल दीक्षित या चार विद्यार्थ्यांचा सत्कार मा. टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. हे सर्व विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी दिल्ली येथे जाणार आहेत.
या विशेष पुरस्कार वितरणानंतर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले, “आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. शाळेबाहेरच्या टपऱ्यांवर जिथे अमली पदार्थ विकले जात असतील तिथे प्रयत्नपूर्वक ही विक्री रोखली पाहिजे, त्यासाठी एक कार्यक्रमच राबवण्याची गरज आहे. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल.“
या नंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. मृण्मयी अभिजित चितळे, अथर्व विनय पारसवार, आशा लहू कानतोडे या पारितोषिक प्राप्त गुणवंतांनी या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक मा. टेमकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालायला शिका. समाज आणि देशाला आपला काय उपयोग होईल याचा विचार करा. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले? याचा विचार करा. चांगले नागरिक व्हा.”
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरूद्ध देशपांडे विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना म्हणाले, “संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. ते कसे व्यतित करायचे, कोणकोणत्या गोष्टींचे भान राखायचे हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे, तुमच्यासमोर संधींचे आकाश खुले आहे. जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे पण स्पर्धा हे जीवनाचे तत्वज्ञान बनता कामा नये. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही, तंत्रज्ञान हे माहिती जमा करण्याचे साधन आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, तसे असते तर सर्वच ग्रंथालये महान ठरली असती आणि त्यातील ग्रंथ हे ऋषी झाले असते. ज्ञानाचे स्वरूप विस्तृत आहे. निसर्गात जाऊन आनंद लुटला पाहिजे तो आनंद कॉम्प्युटर देऊ शकणार नाही. कोणताच हुशार विद्यार्थी आता पुढे जाऊन शिक्षक व्हायचे आहे असे म्हणत नाही. कोणीच शिक्षक होण्यास तयार नसेल तर भविष्यात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षक होणे म्हणजे पिढी घडवणे आणि त्या महत्त्वाकांक्षेसारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही. जीवनात तळमळ ही फार महत्त्वाची असते. कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका अंगी उद्दामपणा येऊ देऊ नका. कृतघ्नता हा सर्वात मोठा दुर्गुण आहे, कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. नव्या संस्कारांना सामोरे जाताना कसोटी लागते पण पर्यावरणाचे रक्षण करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पाण्याची आणि अन्नाची नासाडी होऊ न देणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवनाला दिशा मिळते. आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यकच आहे पण दुसऱ्याकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले पाहिजे. समुहात राहिले म्हणजे अहंकार कमी होतो, निखळ आनंद घेता येतो. मूल्यसंपन्न जीवन जगणे ही आपण शाळेला दिलेली खरी भेट असते. श्रमाशिवाय एकही पैसा मिळवण्याची इच्छा करू नका आणि आपला देश, आपला समाज यांच्याबद्दल मनात कधीही तुच्छतेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. आपला देश आणि समाज जसा आहे तसा स्वीकाराला पाहिजे आणि अपेक्षित आहे तसा घडवला पाहिजे,”
संस्थेचे सचिव डॉ. संजय देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गायलेल्या पसायदानाने या आनंद सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील शिक्षिका श्रीमती प्रिती धोपाटे यांनी केले.