“कला ही माणसाला निसर्गातील इतर प्रणिमात्रांपासून वेगळी बनवते, कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. आज सर्वत्र मूल्यशिक्षणाबाबत बोलले जात आहे. कला हेच सौंदर्याचे प्रमुख मूल्य आहे. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघितले जाते. पण कलेमुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य बघायला आपण शिकतो. कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य ओळखायची क्षमता निर्माण होते आणि ती जाणीव आपल्या आचरणात येते, ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना व ज्येष्ठ गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १७ जानेवारी २०१९) झाले. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर बोलत होत्या. 

मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाच्या सदस्य व मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे तसेच ‘मएसो कलावर्धिनी’तील कला मार्गदर्शक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ज्येष्ठ संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण व रश्मी देव याप्रसंगी उपस्थित होते. 

‘मएसो कलावर्धिनी’त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी शास्त्रीय संगीत, संवादिनी (हार्मोनियम), तबला यांचे तसेच सर्व शाळांमधील इ. ६ वी ते इ. ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

संगीत, अभिनय आदी ललित कलांच्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना केली असल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

‘मएसो कलावर्धिनी’त तीन महिन्यांच्या अभिनय प्रशिक्षण वर्गात आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून कलेची आवड जोपासायला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच मदत होईल असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले. 

आरती ठाकूर-कुंडलकर कलेच्या प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाल्या की, संगीत हे स्वतःच्या आनंदासाठी शिकले पाहिजे. अल्प कालावधीत कलेची तोंडओळख होते आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कलेचे रसग्रहण शिकल्यामुळे कलाकाराबरोबरच उत्तम रसिकही घडतात. 

मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी, ‘मएसो कलावर्धिनी’त कालांतराने नृत्य, शिल्प, चित्र आदी कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात दिली. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर संजय देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.

Scroll to Top
Skip to content