पुणे, दि. २६ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाच्या विकास आणि विस्तारासाठी कोलकाता येथील उद्योजक कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कुलकर्णी परिवाराने भरघोस अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे या विभागाचे ‘अण्णासाहेब कुलकर्णी (कोलकाता) जैवविविधता विभाग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. सतीश कुलकर्णी महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाचे मानद वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करणार आहेत. ‘यमाई फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ट्रायोट्रेंड एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून हा निधी दिला आहे. उद्योगांनी अशाप्रकारे घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी संशोधन करता येणार असून संशोधनाच्या कार्याला चालना मिळणार आहे. आज सकाळी, रविवार, दि.२६ मार्च रोजी संस्थेच्या गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी डॉ. सतीश कुलकर्णी आणि श्री. मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून या निधीचा धनादेश स्वीकारला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट तसेच कुलकर्णी परिवारातील सदस्य, आप्त-स्नेही, डॉ. मदन फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी, पर्यावरण, हवामान बदल, देशीज वनस्पती आणि प्राणी यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि पश्चिम घाटाचे मूळ स्वरूप अबाधित राखण्यासमोरील आव्हाने यासंदर्भात मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाची ध्येय, उद्दीष्टे आणि प्रत्यक्ष काम अत्यंत सुसंगत आहेत. त्यामुळेच या विभागाला हे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. डॉ. सतीश कुलकर्णी हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे. कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स लिव्हरमोर लॅबोरेटरीच्या न्यूक्लिअर टेस्ट इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख म्हणून २८ वर्षे, नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य विषयक काऊन्सिलर म्हणून ३ वर्षे ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर निरपेक्ष वृत्तीने विविध संस्थासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी खरगपूर येथील आय.आय.टी. मधून केमिकल इंजिनीअरींगमध्ये बी. टेक. केल्यानंतर कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कातडी वस्तूंची निर्मिती आणि निर्यातीच्या व्यवसायात कार्यरत झाले. युरोप आणि अमेरिकेतील रॅडली, पिकागो यासारख्या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडबरोबर त्यांचा व्यावसायिक संबंध आहे. कै. अण्णासाहेब कुलकर्णी हे कातडी वस्तूंच्या निर्यात व्यवसायाचे जनक मानले जातात. या क्षेत्रात त्यांच्या उद्योगाचे नाव अग्रेसर आहे.